पर्यावरण प्रेमी अमोल कुलकर्णी यांची बिबट्या प्रबोधन रथयात्रा पोहोचली चंदगडच्या माडखोलकर महाविद्यालयात - चंदगड लाईव्ह न्युज

09 October 2024

पर्यावरण प्रेमी अमोल कुलकर्णी यांची बिबट्या प्रबोधन रथयात्रा पोहोचली चंदगडच्या माडखोलकर महाविद्यालयात

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     वनविभाग  कोल्हापूर, सामाजिक वनीकरण, व्याघ्र प्रकल्प राखीव व वन्यजीव जनजागृती विभाग, राधानगरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित NIT  विभाग समन्वयक पर्यावरण प्रेमी अमोल कुलकर्णी यांची बिबट्या प्रबोधन रथयात्रा  पोहोचली सह्याद्री घाटातील  निसर्गरम्य सौंदर्याच्या कुशीत वसलेल्या चंदगडच्या माडखोलकर महाविद्यालयात.

    दि. 1 ते 7 ऑक्टोबर, 2024 या वन्यजीव सप्ताहा निमित्त बिबट्या जनजागृती रथयात्रा गेले आठवडाभर कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये नेऊन शाळा, महाविद्यालये, वनीकरण विभाग, सार्वजनिक ठिकाणी प्राणी, पक्षी व पर्यावरणाविषयीची जनजागृती करण्याचे अनमोल कार्य पर्यावरण प्रेमी श्री.अमोल कुलकर्णी हे करीत आहेत. त्यानी आज दिनांक 7  ऑक्टोबर, 2024 रोजी चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालय, दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्युनियर कॉलेज, चंदगड, बस आगर चंदगड फॉरेस्ट विभाग चंदगड व पाटणे अशा विविध ठिकाणी स्थानिकांच्या सहकार्याने चंदगड तालुक्यातील गावोगावी प्रबोधन कार्य व जनजागृती करीत पर्यावरणाविषयीची लोकांमध्ये आवड निर्माण करण्याचे उत्तम कार्य केले. विविध शाळा कॉलेजीस व समाजातील लोकांना त्यांनी प्रत्यक्ष चित्ररथाच्या माध्यमातून बिबट्या विषयीच्या गैरसमजुती प्राणी उपयोगीता निसर्ग साखळी, पर्यावरण संरक्षण, नैसर्गिक साधनसंपत्तीच्या अभावामुळे होणारे संभाव्य धोके संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी, निसर्ग आणि समाजाचे घनिष्ठ नाते अशा विविध विषयांवर विद्यार्थी व समाजाशी हितगुज केली. लोकांमध्ये असणारी बिबट्या या वन्य प्राण्याविषयीची भीती दूर करण्याचे उत्तम कार्य त्यानी केले. सर्वांना पर्यावरण व  वन्यजीवांचे पर्यायाने निसर्गाचे संरक्षण करण्याचा मोलाचा संदेश सर्वांना दिला.
       प्रारंभी र. भा. माडखोलकर महाविद्यालय चंदगड *राष्ट्रीय सेवा योजना* विभागाच्या वतीने महाविद्यालयात रथयात्रेचे स्वागत करण्यात आले. NSS चे प्रकल्प अधिकारी व जिल्हा समन्वय डॉ. संजय पाटील व न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य एन. डी. देवळे यांनी अमोल कुलकर्णी यांचे स्वागत केले. वन्य प्राण्यांच्या प्रबोधनात्मक माहितीचे पोस्टर त्यांनी महाविद्यालय व ज्युनिअर कॉलेजला सुपूर्द केले. ग्रंथपाल प्रा. आर. एस. गडकरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment