चंदगड : सी एल वृत्तसेवा
सेवानिवृत्त केंद्र मुख्याध्यापक, दैनिक पुढारी चे पत्रकार तसेच मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष श्रीकांत वैजनाथ पाटील (कालकुंद्री, ता चंदगड) यांना 'राष्ट्रीय दीपस्तंभ जीवन गौरव पुरस्कार' नुकताच प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळा शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे पार पडला.
ज्ञानसागर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कोल्हापूर चे अध्यक्ष गजानन सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली व सुप्रसिद्ध दूरदर्शन मालिका व चित्रपट अभिनेते मिलिंद दास्ताने यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समृद्धी प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष एन बी खरात यांनी केले. स्काय इंटरनॅशनल टुरिझम या संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी आदर्श पत्रकार म्हणून श्रीकांत पाटील यांची कोल्हापूर जिल्ह्यातून निवड करण्यात आली होती. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून केलेले पत्रकारिता क्षेत्रातील तसेच राष्ट्र व समाज उभारणीच्या उदात्त हेतूने शैक्षणिक सेवेत घडवलेले हजारो विद्यार्थी अशा अतुलनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार 'अतुल्य भारत प्रतिभा संमेलन २०२४' या कार्यक्रमात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. रविवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी मैत्री सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा गोलीपकर (सातारा) यांच्यासह डिजिटल मीडिया राज्य कार्यकारणी सदस्य अनिल धुपदाळे, चंदगड पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार ढेरे, सी एल न्यूज चे संपादक संपत पाटील, पत्रकार चेतन शेरेगार, संदीप तारीहाळकर, माजी सैनिक शंकर कोले, श्रीकांत सुबराव पाटील, जे के पाटील आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पुरस्काराबद्दल श्रीकांत पाटील यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment