कौशल्यपूर्ण व्यक्ती बना यश मिळेल: संग्राम देशमुख, हलकर्णी महाविद्यालयात प्लेसमेंट कॅम्प - चंदगड लाईव्ह न्युज

09 October 2024

कौशल्यपूर्ण व्यक्ती बना यश मिळेल: संग्राम देशमुख, हलकर्णी महाविद्यालयात प्लेसमेंट कॅम्प

 


चंदगड / प्रतिनिधी 

         'बँकिंग क्षेत्रात काम करण्यासाठी मानसिकता बदला. आजच्या युगात बँकिंग क्षेत्र विस्तारित होत आहे. कौशल्यपूर्ण व्यक्तींना अधिक संधी मिळते. कोणत्याही शाखेतील विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रात काम करण्याची संधी प्राप्त होते ती मिळवण्यासाठी प्रयत्न करा.' असे प्रतिपादन आय बी पी एस संचालक संग्राम देशमुख यांनी केले. ते हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बोलत होते. महाविद्यालयातील प्लेसमेंट सेल कमिटी यांच्यावतीने प्लेसमेंट कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी डी अजळकर उपस्थित होते . 

       प्रारंभी स्वागत प्राचार्य डॉ बी डी अजळकर यांनी केले. प्रास्ताविक प्लेसमेंट सेल चे प्रमुख प्रा. जी जे गावडे यांनी केले. प्राचार्य डॉ बी डी अजळकर म्हणाले, ' मनातील न्यूनगंड बाजूला सारा म्हणजे यशापर्यंत पोहोचाल. आपल्या महाविद्यालयात संधी मिळवून दिले जाते त्यातून तुमचे करिअर घडवा. नेहमी शिस्तप्रिय विद्यार्थी व माणूस बनवण्याचा प्रयत्न करा . मोबाईलचा अति वापर टाळा तुमच्या बुद्धीला कौशल्याची साथ द्या . अनेक यशस्वी व्यक्तींचा आदर्श घ्या . ज्ञान आपल्याला सक्षम बनवत त्यामुळे गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचा लाभ करून घ्या.'यावेळी व्यासपीठावर सहा. व्यवस्थापक स्वरूप कारंडे, निखिल पाटील डॉ व्ही व्ही कोलकार आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते. 

       यावेळी महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ व्ही व्ही कोलकार यांनी केले तर आभार प्रा जी पी कांबळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment