चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
तुर्केवाडी (ता. चंदगड) येथे प्रताप उर्फ पिनूदादा पाटील युवा फाउंडेशन व संघर्ष प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित "होम मिनिस्टर स्पर्धा 2024" नवरात्र उत्सव निमित्ताने अत्यंत जल्लोषात पार पडली. या स्पर्धेचा मुख्य उद्देश महिलांना निखळ मनोरंजन, आनंद आणि प्रबोधन देणे हा होता. स्पर्धेमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला, ज्यामध्ये माहेरवाशीन महिलांनी विविध खेळांमध्ये आपली कौशल्ये दाखवून स्पर्धा रंगतदार बनवली.
या स्पर्धेत प्रमुख मानकरी म्हणून नम्रता शोधन कागणकर हिने "पैठणी" मिळवून पहिल्या क्रमांकाचे स्थान पटकावले, तर उपविजेती सोनम नारायण पाटील हिला सोन्याची नथ देऊन सन्मानित करण्यात आले. माधवी अजित मोरे हिला आकर्षक भेटवस्तू देऊन तृतीय क्रमांकाचा सन्मान करण्यात आला. महिलांनी घेतलेल्या या स्पर्धेने संपूर्ण वातावरणात उत्साहाची लहर निर्माण केली.
होम मिनिस्टर स्पर्धेत विविध पारंपरिक आणि मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये "तळ्यात मळ्यात", "लिंबू चमचा", "फुगे फोडणे", "संगीत खुर्ची", "चेंडू बादलीत टाकणे", "स्ट्रॉ खोप्यात घालणे", "तोंडाला टिकल्या लावणे", आणि "पिठातील चेंडू तोंडाने काढणे" यासारखे खेळ प्रमुख होते. या खेळांमध्ये महिलांनी प्रचंड सहभाग नोंदवून स्पर्धेला अधिक रंगत आणली.
बक्षीस वितरण समारंभात प्रमुख मान्यवर म्हणून प्रताप उर्फ पिनूदादा पाटील, रोहिणी प्रताप पाटील, जी. एन. पाटील, संघर्ष प्रतिष्ठानचे हरिभाऊ रामू गावडे, एम. के. पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना पैठणी आणि सोन्याची नथ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन गीता गणपती पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोहिणी प्रताप पाटील होत्या. यावेळी त्यांनी महिलांसाठी आयोजित अशा कार्यक्रमांमुळे नारी सन्मानाची भावना जागृत होते, असे मत व्यक्त केले. सरपंच संजीवनी अशोक ओऊळकर, पोलीस पाटील माधुरी कांबळे, ग्रामपंचायत सदस्य सावित्री गावडे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा समारंभ संपन्न झाला.
नवरात्र उत्सव निमित्ताने "नवदुर्गा" या संकल्पनेवर आधारित विविध खेळ घेण्यात आले. प्रत्येक खेळामध्ये सहभागी झालेल्या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. "तळ्यात मळ्यात" खेळातील विजेती सुवर्णा गावडे, "फुगे फोडणे" विजेती तेजस्वी वरुडकर, "लिंबू चमचा" विजेती माधवी मोरे, तसेच अन्य खेळांमध्येही महिलांनी कौशल्य दाखवले. संपूर्ण स्पर्धेचे सुत्रसंचालन संजय साबळे व रवी पाटील यांनी आपल्या अनोख्या खुमासदार व विनोदी शैलीत केले.
मराठी गीते तानाजी पाटील व कु. देवयानी पाटील यांनी सादर केली. या कार्यक्रमाने महिलांना मनमुराद आनंद आणि सन्मानाची भावना दिली. तुर्केवाडीतील या होम मिनिस्टर स्पर्धेने नारी सन्मानाच्या संकल्पनेला नवीन उंचीवर नेले आहे.
No comments:
Post a Comment