चंदगड/ दोडामार्ग : सी एल वृत्तसेवा
तिलारी- दोडामार्ग घाटातून १ जुलै २०२४ पासून बंद असलेली एसटी सेवा तात्काळ सुरू करावी. या मागणीसाठी काल सोमवार पासून जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे मार्गावरील गावातील सरपंच, उपसरपंच, महिला व सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे. याची दखल घेऊन प्रांताधिकारी गडहिंग्लज यांनी तहसीलदार, बांधकाम व एसटी महामंडळाचे अधिकारी आदी लवाजम्यासह चंदगड तालुक्यातील कोदाळी पासून दोडामार्ग पर्यंतच्या रस्त्याची पाहणी केली. तथापि संबंधित अधिकारी बांधकाम विभागाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे तसेच एसटी सुरू करण्याबाबत त्यांच्याकडून अनास्था असल्याचा संशय यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केला.
सोबत आणलेल्या वाहनात बसूनच पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना स्थानिक ग्रामस्थांनी धारेवर धरले. घाट परिसरात एकदाही अधिकारी गाडीतून खाली उतरले नाहीत असे ग्रामस्थांनी सांगितले. या प्रश्नी सकारात्मक अहवाल सादर न केल्यास पुन्हा उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.
गेली ४० वर्षे या घाटातून विविध आगाराच्या एसटी बस सुरू आहेत. सद्यस्थितीत केवळ एसटी बस बंद केलेल्या आहेत. मात्र एसटीच्या दुप्पट तिप्पट वजनदार व मोठी वाहने राजरोसपणे धावत आहेत. असे असताना अवजड वाहने सुरू नसल्याचा अहवाल देण्याचा खटाटोप पाहणी साठी आलेले अधिकारी करत असल्यास आरोप ग्रामस्थांनी केला आहे. बंदी काळातही अनेक अवजड वाहने व मोठे कंटेनर घाटात येऊन दोन दोन दिवस अडकून पडले होते. हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे. असे ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले. एसटी बस अभावी परिसरातील प्रवासी व ग्रामस्थांचे किती हाल होत आहेत? याचा विचार जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांनी करावा, बांधकाम विभागाकडून रस्त्याची नियमित देखभाल दुरुस्ती होत नाही. रस्त्यावर आलेल्या झाडांच्या फांद्या तशाच आहेत. याचा पाढा अधिकाऱ्यांसमोर ग्रामस्थांनी वाचला.
१० ऑक्टोबर पासून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी एसटी बसेस सुरू करण्यासाठी सकारात्मक निर्णय न घेतल्यास उग्र आंदोलन छेडले जाईल. व १० तारखे नंतर पोलीस व बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने येणाऱ्या अवजड व इतर वाहनांना आंदोलक लक्ष करतील. याची जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील. असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रविण गवस व सहकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment