चंदगड : सी एल वृत्तसेवा
बेळगाव- वेंगुर्ला राज्य मार्गावर पाटणे फाटा परिसरात तावरेवाडी गावच्या हद्दीत झालेल्या ट्रक व मोटरसायकल अपघातात मजरे कार्वे (ता. चंदगड) येथील उमदा तरुण ठार झाला. आदित्य दीपक बोकडे, वय १७ असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना आज मंगळवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद मयताचा चुलत काका राजेंद्र विठ्ठल बोकडे यांनी चंदगड पोलिसात दिली आहे.
याबाबत चंदगड पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, घटनेतील मयत आदित्य हा आपल्या गावातील मारुती पांडुरंग इंजल यांच्या हिरो होंडा मोटरसायकल (नंबर MH09FK1599) वरून पाठीमागे बसून कामानिमित्त हलकर्णी फाटा येथे चालला होता. त्यांची गाडी तावरेवाडी गावाच्या हद्दीत शिवशंभो करिअर अकॅडमी समोर आली असताना चंदगड कडून बेळगावच्या दिशेने भरधाव जाणारा अशोक लेलॅन्ड ट्रक (नंबर -KA-22-C-5273) या वाहनाची मोटरसायकलला धडक बसली. यातील आरोपी ट्रक ड्रायव्हर संतोष मनोहर शिंदे, राहणार पार्वती नगर, उद्यमबाग बेळगाव (कर्नाटक) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे भरधाव पणे ट्रक चालवून मोटरसायकलवर पाठीमागे बसलेल्या आदित्य बोकडे याला ट्रकच्या पाठीमागील बाजूने जोराची धडक दिली. धडकेत तो मोटरसायकल वरून बाहेर फेकला गेला. यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आरोपीवर चंदगड पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर : 338/2024 भारतीय न्याय संहिता 106 [1], 281, 125[a], 125[b] सह मोटरवाहन कायदा कलम 184, 134 [a] [1] प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशान्वये पोलीस हेडकॉन्स्टेबल श्री. पाटील हे करत आहेत.
No comments:
Post a Comment