महादेवराव बी एड कॉलेज येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त फोटो पूजन करताना मान्यवर |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
३ जानेवारी २०२५ रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महादेवराव बी. एड. कॉलेज, तुर्केवाडी येथे मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरवातीस सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रभारी प्राचार्य कांबळे एन.जे. यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सौ. वंदना कालकुंद्रीकर (बी.डी.जुनिअर कॉलेज,बागीलगे) आणि प्रा. श्री. एस. बी. मगदूम (जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालय,गडहिंग्लज) हे उपस्थित होते.
“ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या वाटा खुल्या करून स्त्री सबलीकरणाचे काम सर्वप्रथम केले. प्रत्येक क्षेत्रातील महिलांची उल्लेखनीय कामगिरी सावित्रीबाई यांच्यामुळे शक्य झाली आहे. मुलांच्यावर चांगले संस्कार करणे, आर्थिक सक्षमता प्राप्त करणे, स्वसंरक्षण करणे यातून महिलांनी आपली नवी ओळख करावी. आजच्या युगात जर स्त्री व पुरुष एकाच विचाराने पुढे गेल्यास आपला देश सुजलाम व सुफलाम होईल व स्त्री सबलीकरणाची गरज भासणार नाही.” असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्या प्रा. वंदना कालकुंद्रीकर यांनी केले.
प्रा. एस.बी. मगदूम यांनी “नारीशक्तीमुळेच थोर व्यक्ती तयार झाल्या व आजच्या महिलांनी स्वकर्तुत्वातून सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवला”, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुस्तक प्रदर्शन, भित्तीपत्रके प्रदर्शन घेणेत आले. प्रशिक्षणार्थी किरण नाईक, अन्नपूर्णा कांबळे, भारती शिंदे, शिल्पा सुतार, यांनी मनोगत व्यक्त केले. दुपारच्या सत्रामध्ये स्वसंरक्षण तंत्र सादरीकरण घेणेत आले. आदिनाथ गावडे यांनी स्वसंरक्षण प्रात्यक्षिकाचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष महादेवराव वांद्रे, विभागप्रमुख प्रा. प्रधान ग. गो., प्रा. मुल्ला एम.आर., प्रा.पाटील वाय. पी., कार्यालयीन अधीक्षिका स्वप्ना देशपांडे, प्रा. एस.पी. गावडे, परशराम काजीर्णेकर, दीपाली पाटील, बी. एड. प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूनम कार्वेकर यांनी तर सूत्रसंचालन श्रद्धा मटकर यांनी केले. पुष्पलता कांबळे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment