चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
सध्याच्या काळात सुशिक्षित तरून नोकरीच्या शोधात वणवण भटकत आहेत. त्यात सरकारी नोकरी मिळवणे ही जवळपास दुरापास्त गोष्ट ठरते आहे. नोकरीच्या मागे धावता धावता अनेकांची वयोमर्यादा संपली आहे. पण मनात आत्मविश्वास, ध्येय, जिद्द, चिकाटी अन् कष्ट करायची तयारी असेल तर सरकारी नोकरीच्या मागे आपण धावण्याऐवजी नोकऱ्याच आपल्या मागे धावू शकतात. हे चंदगड तालुक्यातील एका शिक्षकाने हे दाखवून दिले आहे.
इनाम म्हाळूंगे येथील प्राथमिक शाळेत शिक्षक असलेल्या रोहित विनायक पवार यांना सातव्यांदा शासकीय नोकरीत अधिकार पदावर नियुक्तीचे पत्र आले आहे. हा एक विक्रमच म्हणावा लागेल. इतक्या वेळा अधिकार पदावर निवड होऊनही प्राथमिक शाळेत लहान विद्यार्थ्यांना घडवण्यात रममाण झालेले पवार गुरुजी यांचा ध्येयवेडा प्रवास अचंबित करणारा तसेच युवक वर्गाला प्रेरणादायी असाच आहे.
यवतमाळ जिल्हयातील रोहित पवार यांचे शिक्षण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झाले आहे. शेतकरी असणाऱ्या आईवडीलांची रोहितने शिक्षक बनावे अशी तिव्र इच्छा होती. आईवडिलांच्या इच्छेखातर रोहितने गणित विषयातून एम एस्सी, इंग्रजी विषयातून एमए व नंतर बीएड केले. यानंतर कोल्हापूर जिल्हयातील चंदगड तालूक्याच्या इनाम म्हाळुंगे येथे परीक्षेच्या माध्यमातून जून मध्ये पदवीधर अध्यापक म्हणून निवड झाली. स्पर्धा परीक्षा दिलेल्या रोहित पवार यांचे एकामागोमाग एक असे निकाल येत गेले. यातूनच त्यांना आरोग्य विभाग (अमरावती), पदवीधर शिक्षक (कोल्हापूर), भांडारपाल जलसंपदा विभाग (नागपूर), आरोग्य सेवक (भंडारा), राज्य उत्पादन शुल्क विभाग (यवतमाळ) व कारागृह अधीक्षक अशा शासकीय नोकऱ्यांची ऑफर आली. यानंतर कालच आलेल्या MPSC निकालात त्यांना सातव्यांदा सहायक महसूल अधिकारी म्हणून निवड पत्र आले. त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. सलग ७ वेळा यशाला गवसणी घातूनही प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणूनच काम करण्यावर ते ठाम आहेत. या अवलिया शिक्षकाचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व केंद्रातील शिक्षकानी अभिनंदन केले .
त्यांना नोकरी मिळाली यातच माझा आनंद
सात वेळा मिळालेली सरकारी नोकरी सोडून दिल्याने त्या जागी अन्य उमेदवारांची निवड झाली. त्यामुळे त्यांच्या आयुष्याचे कल्याण झाले. यातच माझे समाधान आहे. माझे ध्येय अजूनही खूप मोठे आहे. ते मी माझ्या आत्मविश्वासाच्या जोरावर साध्य करणारच साहे असा ठाम विश्वास चंदगड लाईव्ह न्युज प्रतिनिधीशी यावेळी बोलताना व्यक्त केला. युवकांनी अपयशाला संधी समजून कठोर परिश्रम केल्यास यश नक्की मिळते. यासाठी मन, मेंदू अन् मनगटाचा योग्य वापर करण्याचा सल्लाही रोहीत पवार यानी तरुण तरुणींना दिला.
No comments:
Post a Comment