माडखोलकर महाविद्यालयामध्ये कला शाखेच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा स्नेह मेळावा उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

13 February 2025

माडखोलकर महाविद्यालयामध्ये कला शाखेच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा स्नेह मेळावा उत्साहात



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयामध्ये कला शाखेच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा स्नेह मेळावा  महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस. डी गोरल यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.

     प्रारंभी प्रास्ताविक डॉ. रंजना कमलाकर यांनी करून पालक व विद्यार्थी मेळावा घेण्यासंदर्भातली उद्दिष्टे सांगितली. विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या अडीअडचणी सोडवण्याबरोबरच त्यांच्यामध्ये सुसंवाद राहावा यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे डॉ. कमलाकर यांनी सांगितले.

     यावेळी बोलताना प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना प्रा. व्ही. के. गावडे म्हणाले की, प्रारंभीच्या कालावधीमध्ये उच्च शिक्षणाची सोय चंदगड मध्ये नव्हती मात्र र. भा. माडखोलकर  सर यांच्या कै. एस. एन. पाटील व अन्य सहकाऱ्यांच्या प्रयत्नाने माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांनी  या कॉलेजला मंजुरी दिल्याने  या भागातल्या गोरगरीब व दुर्गम  भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय झाली. सर्व सोयीने युक्त असणारे ग्रामीण भागातील असे  गुणवत्तापूर्ण आपले महाविद्यालय हे एकमेव आहे. खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना आपुलकीची वागणूक देऊन त्यांना योग्य पद्धतीने गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे काम आपल्या महाविद्यालयामध्ये चालते. या सर्वांचा उपयोग सर्व विद्यार्थ्यांनी करून घ्यावा व आपली प्रगती साधावी असे आवाहन त्यांनी केले.

     अध्यक्ष भाषणात डॉ. एस. डी. गोरल म्हणाले  की, ``आपल्या महाविद्यालयामध्ये वैविध्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे काम आपल्या महाविद्यालयामार्फत चालते असे सांगून त्यांनी महाविद्यालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीच्या विविध संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. यावेळी रवींद्र जाधव, भैरू गडदे, साधना गावडे इत्यादी पालकांनी विचारलेल्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले. प्रा. ए. डी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. आभार डॉ. पांडुरंग भादवणकर यांनी मांडले.

 या कार्यक्रमाला डॉ. जी. वाय. कांबळे, डॉ. एस. एस. सावंत, डॉ. एन. के. पाटील, डॉ. एस. डी. गावडे, डॉ. ए. वाय. जाधव, डॉ एन. एस. मासाळ, प्रा. राजकुमार तेलगोटे, डॉ. एस. एन. पाटील, डॉ. बाबली गावडे, प्रा. सौ. सरोजिनी दिवेकर, प्रा. एस. व्ही कुलकर्णी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment