सुनेच्या रक्षा विसर्जन दिवशी सासूचेही निधन, कालकुंद्री येथील घटना - चंदगड लाईव्ह न्युज

13 February 2025

सुनेच्या रक्षा विसर्जन दिवशी सासूचेही निधन, कालकुंद्री येथील घटना

श्रीमती विमल शिवाजी पाटील (सासू)

 
वैशाली पांडुरंग पाटील (सुन)


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

           कालकुंद्री (ता. चंदगड) शिवाजी गल्ली येथील वैशाली पांडुरंग पाटील (साळूगावडे) वय ४५ यांचे दीर्घ आजाराने सोमवार दि. १० फेब्रुवारी २०२५ रोजी निधन झाले होते. आपल्या सुनेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या वृद्ध सासू श्रीमती विमल शिवाजी पाटील (वय ८५) यांच्यावर मोठा आघात करणारी ही घटना होती. 

        सुनेने प्राण सोडताना सासूला आई अशी हाक मारून प्राण सोडला होता. या दोघींत एकमेकींबद्दल जिव्हाळा होता. सासु सुनेचे प्रेम दाखवणारे हे एक दुर्मिळ उदाहरण म्हणावे लागेल. लाडक्या सुनेच्या अकाली मृत्यूच्या धक्क्याने त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तात्काळ पुणे येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तथापि वैशाली हिच्या (दि १३) रक्षा विसर्जन दिवशी उपचार सुरू असताना आज दि १३/०२/२०२५ रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर कालकुंद्री स्मशानभूमीत सायंकाळी ७ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

     एका दुःखातून सावरण्यापूर्वीच दुसरे दुःख ओढवल्यामुळे पाटील कुटुंबीयांवर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. श्रीमती विमल पाटील या दिवंगत प्राथमिक शाळा मुख्याध्यापक शिवाजी आप्पाजी पाटील यांच्या पत्नी, तर दौलत- अथर्व इंटरट्रेड प्रा.लि.  साखर कारखाना हलकर्णीचे सहाय्यक शेती अधिकारी पांडुरंग उर्फ बाळू पाटील यांच्या मातोश्री होत. विमल यांच्या पश्चात मुलगा व नातू असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment