चंदगडच्या जंगलात वन्यप्राणी शिकारीसाठी बॉम्ब लावणारे दोघे वन खात्याच्या जाळ्यात, आरोपींना तीन दिवसांची वन कोठडी - चंदगड लाईव्ह न्युज

12 February 2025

चंदगडच्या जंगलात वन्यप्राणी शिकारीसाठी बॉम्ब लावणारे दोघे वन खात्याच्या जाळ्यात, आरोपींना तीन दिवसांची वन कोठडी

चंदगड : सी एल वृत्तसेवा
    चंदगडच्या जंगलात वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी स्फोटके (बॉम्ब) लावणारे दोघे आरोपी चंदगड वन खात्याच्या जाळ्यात अडकले. त्यांच्या विरुध्द वन अधिनियम १९२७ व वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ कायद्याच्या २(१६), ९, ३२, ३९, ५० व ५१ भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) डी, आय, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  जेमीनी मंजु रजपुत रा. हक्किपक्की कॅम्प, होसुडी, सदाशिवपुरा ता.जि. शिमोगा (कर्नाटक) व मंजुनाथ धरम रजपुत रा. हक्किपक्की कॅम्प, होसुडी, सदाशिवपुरा ता.जि. शिमोगा (कर्नाटक) अशी मुद्देमालासह ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
    दि.१०/०२/२०२५ रोजी चंदगड वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या वनपरिमंडळ चंदगड येथील मो. चंदगड जंगल कक्ष क्र. ३ मध्ये वनपाल चंदगड  कृष्णा डेळेकर, वनरक्षक सागर कोळी, आकाश मानवतकर, वनसेवक  नितीन नाईक, व वन्यजीव बचाव पथकातील सदस्य हे पायी गस्तीवर असताना सायंकाळी ०५.०० च्या दरम्यान अनोळखी दोन इसम शिकारीचे हेतूने बकऱ्याचे चारट (चरबी) लावलेले स्फोटक गोळे (बॉम्ब गोळे) जंगल क्षेत्रातील जाणाऱ्या पायवाटेवर ठिकठिकाणी वेगवेगळया दिशेने ठेवत असताना आढळले. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठिकाणची तपासणी केली असता त्यांचा वन्य प्राणी शिकारीचा उद्देश दिसून आला. घटना स्थळी आरोपींची तपासणी केली असता आरोपी कडुन ठेवलेले व त्यांचेकडील एकुण स्फोटक गोळे नग संख्या-१००, निळ्या रंगाची कापडी पिशवी १ नग, निळ्या रंगाची प्लॅस्टिक पिशवी १ नग, मोबाईल नग-०२, वाहन मोटार सायकल-०१ (KA14EW 5364) इत्यादी मुद्देमाल जागेवर जप्त करून प्र.गु.रि.क्र.WL-०१/२०२५दि.१०/०२/२०२५ अन्वये वनगुन्हा नोंद करुन आरोपींना दि.११/०२/२०२५ रोजी रितसर अटक करुन त्यांना मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग-१ चंदगड यांचे न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांना ०३ दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.
  सदर गुन्हयाचा तपास श्री. जी. गुरुप्रसाद उप वनसंरक्षक (प्रा.), कोल्हापुर,  नवनाथ कांबळे सहाय्यक वनसंरक्षक (खा. कु.तो व वन्यजीव) यांचे मार्गदशनाखाली  नंदकुमार पां. भोसले वनक्षेत्रपाल चंदगड,  कृष्णा डेळेकर, वनपाल चंदगड आदी  पुढील तपास करीत आहेत.
वन व वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन व जैवविविधतेचे जतन करणे आवश्यक असुन वन्यप्राण्यांचे अवैद्य शिकार व अवैद्य वृक्षतोड अवैद्य अतिक्रमण होत असेल तर तात्काळ परिक्षेत्र वनअधिकारी यांचे कार्यालय चंदगड अथवा वनविभाग कोल्हापुर कडे माहिती देणेत यावी आपले नांव गोपनीय ठेवणेत येईल. असे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment