दुध व्यवसायाकडे मुख्य व्यवसाय म्हणून पाहण्याचे आवाहन - गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर, कानुर परिसरातील दुध संस्थांना भेटी - चंदगड लाईव्ह न्युज

22 February 2025

दुध व्यवसायाकडे मुख्य व्यवसाय म्हणून पाहण्याचे आवाहन - गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर, कानुर परिसरातील दुध संस्थांना भेटी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    चंदगड तालुक्यातील दुग्ध उत्पादक शेतक-यांनी दुध व्यवसायाकडे जोडधंदा म्हणून न पाहता मुख्य व्यवसाय म्हणून पाहावे. जास्तीत-जास्त दुध उत्पादन करुन आपली आर्थिक उन्नती साधावी असे प्रतिपादन गोकुळ दुध संघाच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांनी केल्या. त्या चंदगड तालुक्यातील दुध संस्थांच्या भेटी दरम्यान झालेल्या सभेत बोलत होत्या.

    तालुक्यातील हिंडगाव, फाटकवाडी, इब्राहिमपूर, गवसे, बुजवडे, कुरणी, नांदुरीवाडी, धामापूर, मसुरे, कानूर खु, कानूर बु., पुंद्रा, सडेगुडवळे, भोगोली, बिजुर, म्हाळोंगे, कांजिर्णे, शिरगाव या गावातील दुध संस्थांना प्रत्यक्ष भेटी देवून त्या संस्थांच्या पदाधिकारी व दुध उत्पादक शेतक-यांशी थेट संवाद साधला. यावेळी दुध संस्थांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या व त्याची सोडवणूक करण्या संदर्भातील सूचना दिल्या.

    यावेळी बोलताना श्रीमती रेडेकर पुढे म्हणाल्या, ``गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर २० लाख लिटर दुध संकलनाचा संकल्प केला होता. आजवर साडे अठरा लाख लिटर प्रतिदिन दुध संकलन झाले आहे. आपण २० लाख लिटर संकलनाच्या समीप पोहोचलो आहोत. या संकल्पपुर्तीकरीता दुध उत्पादक शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारच्या जनावरांची खरेदी करावी. हरियाणातील मु-हा, गुजरातमधील म्हैसाणा व जाफराबादी या जातीवंत म्हैशींची खरेदी करावी. यासाठी दुध संघाच्यावतीने प्रति म्हैस रुपये ३५,०००/- अनुदान दिले जाते. तरी शेतक-यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमती रेडेकर यांनी केले.

        यावेळी तावरेवाडी चिलिंग सेंटरचे संकलन अधिकारी भरत पाटील,  सुनिल शिंदे, सुपरवायझर व दुध संस्थांचे पदाधिकारी  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment