चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
"व्यक्तिमत्व विकासासाठी चौफेर वाचन अत्यंत जरुरीचे आहे. महापुरुषांचे जीवन चरित्र आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाला अनेक पैलू देणारे असते. अशा प्रेरणादायी ग्रंथांचे वाचन विद्यार्थ्यांनी अवश्य करावे. विविध विद्या शाखांमध्ये आपले ज्ञान अद्ययावत करण्यासाठी व्यासंग हा अत्यंत गरजेचा असतो. वाचनाचा छंद हा जीवन समृद्ध बनविणारा छंद आहे आणि प्रत्येकाने तो जाणीवपूर्वक जोपासला पाहिजे." असे प्रतिपादन अशोक दळवी यांनी केले. चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील `ग्रंथालय आणि माहिती केंद्र व रसायनशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने' वाचन संकल्प महाराष्ट्राचा' या उपक्रमांतर्गत 'प्रेरणादायी वाचन आणि सर्वांगीण विकास' या विषयावरील वाचनसंवाद कार्यशाळेत बोलत होते.
अशोक दळवी पुढे म्हणाले की, ``वाचनातून मानवी जीवनाचे जसे यथार्थ आकलन होते. तसेच इतिहास, प्रचलित घडामोडी, वर्तमान यांचेही भान येते. यावेळी पुस्तके आपल्या जीवनात कोणता क्रांतिकारक बदल घडवू शकतात याची त्यांनी सोदाहरण माहिती दिली. वाचनामुळे आपण अंतर्मुख होतो तसेच जीवन प्रवासात आपल्याला ग्रंथातील अनमोल विचार मार्गदर्शक ठरत असतात. आपल्या जीवन पद्धतीत सकारात्मक बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य उत्तम ग्रंथांच्या वाचनामुळे होऊ शकते". यावेळी त्यांनीविकी घाई घेन रिटर्न बोर्ड अशा अनेक ग्रंथांचा संदर्भ दिला. माणसाच्या मनात आशावादी दृष्टिकोन व महत्त्वाकांक्षेचे बीज रुजण्यासाठी वाचनाचा छंद अपरिहार्य असल्याचे सांगितले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्र. प्रा. डॉ. एस. डी. गोरल यांनी विद्यार्थ्यांनी केवळ क्रमिक पुस्तकांचा अभ्यास न करता जग जाणून घेण्यासाठी डोळस दृष्टिकोनातून चौफेर वाचन केले पाहिजे असे मत व्यक्त केले.
सुरुवातीस या परिसंवादाचे समन्वयक ग्रंथपाल रा. सु. गडकरी यांनी ग्रंथालयातील सेवा सुविधांचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा व आपल्या उत्तम करिअर साठी आपले ज्ञान अद्ययावत कसे होईल, याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एम. एम. माने यांनी केले. आभार एम. एस. दिवटे यांनी मानले. यावेळी अशोक दळवी यांनी आपल्या' ट्रॅक्टर ड्रायव्हर ते एमडीआरटी अमेरिका 'या ग्रंथाची माहिती दिली तसेच 'वसुंधरा' या आपल्या कार्यासंग्रहातील काही कवितांचे वाचन केले. चैत्राली सुतार या विद्यार्थिनीने स्वरचित कविता सादर केल्या. परिसंवादास प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment