व्यावसायिक शेतीसाठी सुधारित तंत्रज्ञान आवश्यक - संतोष खुटवड - चंदगड लाईव्ह न्युज

11 February 2025

व्यावसायिक शेतीसाठी सुधारित तंत्रज्ञान आवश्यक - संतोष खुटवड

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     व्यवसायिक शेतीसाठी सुधारित तंत्रज्ञान अतिशय आवश्यक आहे असे प्रतिपादन कृषी पर्यवेक्षक संतोष खुटवड यांनी र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये केले. यावेळी त्यांनी 1966 पासून सुरू झालेल्या हरितक्रांतीचा इतिहास सांगताना विविध पिकाच्या उत्पादन वाढीसाठी  कसोशीने प्रयत्न करणारा शेतकरी उत्पादन घटल्यामुळे अस्वस्थ झाला आहे असे सांगितले. पूर्वीच्या सेंद्रिय शेती ऐवजी शेतकरी रासायनिक शेती करावयास शिकला आणि जमिनीची  उत्पादन क्षमता हरवून बसला. बदलत्या काळात शेतीला जर व्यवसायिक स्वरूप आणायचे असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी सर्वप्रथम माती परीक्षण करावे. खते, सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश, इत्यादी आवश्यक घटकांची योग्य मात्रा जमिनीची सुपीकता वाढविण्यास मदत करते. शुद्ध बिजापोटी  फळे रसाळ गोमटी या उक्तीप्रमाणे उत्तम प्रतीचे बीज चांगले उत्पादन क्षमता मिळवून देऊ शकते असे ते पुढे म्हणाले.

     या कार्यक्रमासाठी उपस्थित दुसरे मान्यवर अतिथी बागिलगे गावचे कृषी सहाय्यक श्री सुधाकर मुळे यांनी विविध शासकीय योजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुरगुड विद्यालयाचे माजी प्राचार्य श्री एस आर पाटील सर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सुधारित तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी स्वतःची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी जरूर केला पाहिजे असे सांगितले. या कार्यक्रमासाठी राज्य कर निरीक्षक श्री गोपाळ पाटील, सरपंच नरसू सट्टूपा पाटील, प्रकाश पाटील, चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी डॉ. एस. एन. पाटील, डॉ. एन. के. पाटील, प्रा. एस. बी. दिवेकर, डॉ. एस. डी.  गावडे, प्रा. आर. एस.  पाटील व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment