महाभारत हे मानवी जीवनाचा शोध घेणारे महाकाव्य - प्रा. एस. व्ही. कुलकर्णी, माडखोलकर महाविद्यालयात 'महाभारतातील अर्थनीती' या विषयावर कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

12 February 2025

महाभारत हे मानवी जीवनाचा शोध घेणारे महाकाव्य - प्रा. एस. व्ही. कुलकर्णी, माडखोलकर महाविद्यालयात 'महाभारतातील अर्थनीती' या विषयावर कार्यक्रम

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        "मानवी जीवनातील गुंतागुंतीच्या स्वरूपावर प्रकाश टाकून त्याला  योग्य शिकवण देण्याचे कार्य महाभारत हा ग्रंथ आजही करीत आहे. भारतीय संस्कृतीचे अविभाज्य भाग असलेला हा काव्यग्रंथ प्रत्येकाने आवर्जून वाचला पाहिजे ."असे प्रतिपादन प्रा. एस. व्ही. कुलकर्णी यांनी केले. ते येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या 'महाभारतातील अर्थनीती' या विषयावर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्रा. डॉ. एस. डी. गोरल हे होते.

     यावेळी बोलताना प्रा. कुलकर्णी पुढे म्हणाले की, धर्म आणि अधर्म यांच्या युद्धात धर्म रक्षणासाठी झालेले हे युद्ध अविस्मरणीय आहे. १८ दिवस चाललेल्या या संघर्षात प्रचंड विध्वंस झाला. युद्धाच्या कथा ऐकायला आणि वाचायला कितीही गोड वाटल्या तरी त्यामुळे होणारी हानी अपरिमित असते. जर कौरव पांडवांच्या मध्ये भाऊबंदकी झाली नसती तर कदाचित फार मोठा विध्वंस टाळता येणे शक्य झाले असते. महर्षी व्यासांचा हा ग्रंथ गुंतागुंतीच्या मानवी जीवनाच्या स्वरूपावर प्रकाश  टाकणारा आहे.

     अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्र. प्रा. डॉ. एस. डी. गोरल यांनी" आपले प्राचीन ग्रंथ हे आपली संस्कृती समजून घेण्यासाठी उपकारक असतात हे लक्षात घेऊन प्रत्येकाने आपले सांस्कृतिक संचित अवश्य जोपासले पाहिजे." असे प्रतिपादन केले.

      समन्वयक अकाउंटन्सी विभाग प्रमुख प्रा. एस. के. सावंत यांनी १८ पर्वातील हा महाभारताचा ग्रंथ विद्यार्थ्यांना आजही मार्गदर्शक तत्त्वे समजून घेण्यास उपयुक्त आहे. देशांतर, भाषांतर आणि कालांतर या तीनही कसोट्यातून महाभारत हे महाकाव्य संपूर्ण विश्वाच्या जनमानसावर प्रभाव टाकते. असे मत व्यक्त केले. सूत्रसंचालन अनुराग पाटोळे याने केले. तर पंकज पाटील याने आभार मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment