चंदगड : सी एल वृत्तसेवा
सेवन मराठा लाईट इन्फंट्री बटालियन च्या सेवानिवृत्त माजी सैनिक व अधिकार्यांचा सहकुटुंब गेट-टुगेदर मेळावा नुकताच गोकुळ शिरगाव कोल्हापूर येथे पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी असलेले सुभेदार मेजर रामा पवार यांनी आर्मीतील सेवानिवृत्तीनंतर आपण सैनिक बांधवांनी प्रेम, एकोपा ठेवून जीवनात येणाऱ्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होऊया. असे केल्याने आपले उर्वरित जीवन सुखकर होईल असे मत मनोगतात व्यक्त केले. सुभेदार मेजर गजानन गोविंद चव्हाण म्हणाले देशाच्या संरक्षणासाठी आपल्या युनिटची कर्तबगारी सैनिकांचे योगदान मोलाचे ठरले आहे. त्यामुळेच सेवन मराठा युनिटला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. यापुढेही आपल्या सर्वांच्या योगदानातून युनिटमधील सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी अनेक उफक्रम राबवण्याची संकल्पना आहे. त्याला सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन केले.
युनिटच्या प्रत्येक वाटचालीत नेहमी योगदान देणाऱ्या माजी सैनिक व अधिकाऱ्यांना यावेळी गौरवण्यात आले. याप्रसंगी सुभेदार मेजर शशिकांत सावंत, सुभेदार मेजर शेरा, सुभेदार मेजर रावसाहेब नाटकुले, सुभेदार मेजर मधुकर चौगुले, सुभेदार मेजर विजय घुगरे, सुभेदार मेजर कृष्णा सुतार यांच्यासह सेवन मराठा चे माजी सैनिक व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्व महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला. याचवेळी नुकत्याच झालेल्या ८ मार्च या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सैनिक बांधवांच्या पत्नींना शुभेच्छा गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमासाठी ७ मराठा युनिटचे कोल्हापूर व बेळगाव जिल्हा व परिसरातील सेवानिवृत्त सैनिक व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुभेदार मेजर शिवाजी जाधव यांनी केले. सूत्रसंचालन विठ्ठल भोपळे यांनी केले तर सुभेदार मेजर गजानन चव्हाण निपाणी यांनी आभार मानले. मराठी स्फूर्ती गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
No comments:
Post a Comment