चंदगड : सी एल वृत्तसेवा
एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय चंदगड अंतर्गत माणगाव माणगाव बीट आयोजित 'आरंभ पालक मेळावा' रामपूर येथे उत्साहात पार पडला. बीट पर्यवेक्षिका वनिता इष्टे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या रामपूरच्या सरपंच सुजाता यादव व लकिकट्टे गावच्या सरपंच पाटील यांच्या हस्ते विविध स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले.
पालक मेळाव्यात उपस्थित नवीन जोडपी, आशा स्वयंसेविका, किशोरवयीन मुली, पालक, वृद्ध मातापिता, स्तनदा व गरोदर माता यांना तज्ञांमार्फत स्पर्श, संवाद आणि खेळ, जागृत पालकत्व, सुरक्षित मातृत्व, मेंदूची वाढ व विकास, मेंदूचे जाळे, संवेदनशील पालकत्व, सुरक्षित वातावरण, आहार आणि पोषण तत्वे, स्वच्छता आणि आहार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पालकांसाठी संगीत खुर्ची व इतर मनोरंजक खेळ घेण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी मांडलेल्या विविध वस्तू व पदार्थ यांच्या मांडलेल्या स्टॉल वरून आहार आणि आरोग्य विषयक माहिती देण्यात आली. अंगणवाडीतील चिमुकल्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. यावेळी तालुका प्रकल्प अधिकारी बी बी शिनगारे यांनी मार्गदर्शन केले, ग्रामपंचायत सदस्य विलास नाईक व पालकांनी उपक्रमाचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात पर्यवेक्षिका वनिता इष्टे यांनी अंगणवाड्यांच्या विकासासाठी पालक व समाजाने पुढे यावे असे आवाहन केले.
अंगणवाडी सेविका सुनिता नाईक, वैशाली कांबळे यांनी स्वागत केले. मनीषा नाईक यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माणगाव बीट मधील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment