चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक विभागाच्या वतीने पेन की गन या लघुपटाच्या अभिनय करणाऱ्या नवोदित मुलांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते.
या कार्यशाळेमध्ये प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक अजित मारुती साबळे (आजरा) यांनी चित्रपट क्षेत्रातील अभिनयाच्या संधी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की,कला क्षेत्रामध्ये भरपूर संधी आहेत, ग्रामीण भागातील विद्यार्थी योग्य मार्गदर्शना अभावी सद्यस्थितीत खूपच दूर आहे. त्याला संधीची गरज आहे. सद्यस्थितीमध्ये खेड्यापाड्यातील मुलांच्या हातातील पेन काढून घेऊन त्याच्या हाती दगड व बंदूक दिली जात असल्याने त्याचे जीवन उध्वस्त होत आहे, यासाठी तरुणांनी अभिनयाच्या कलेकडे वळावे, व अभिनयाच्या जोरावर नावलौकिक मिळवावे असे आवाहन त्यांनी या एक दिवसीय कार्यशाळेत बोलताना केले. अध्यक्ष भाषणात प्राचार्य डॉ. गोरल यांनी विद्यार्थ्यांनी अतिशय प्रयत्नपूर्वक अभिनय क्षेत्राकडे वळून आपले करिअर उज्वल करावे असे आवाहन केले.
या कार्यशाळेमध्ये अभिनेते महेश बाबुराव कांबळे, मयूर शिवाजी कांबळे यांनी शेतकरी आत्महत्या, महिलांच्यावर होणारे अत्याचार अशा अत्यंत ज्वलंत विषयावर अभिनय करून उपस्थित विद्यार्थ्यांची वाहवा मिळवली.
सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. ए. डी. कांबळे यांनी प्रास्ताविक करून विद्यार्थ्यांनी अशा वेगवेगळ्या कार्यशाळेचा उपयोग करून घ्यावा व अभिनयाच्या जोरावर आपले करिअर घडवावे असे आवाहन केले. डॉ. बाबली गावडे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला डॉ. रंजना कमलाकर, डॉ. ए. वाय. जाधव, प्रा. सुमया आजरेकर, प्रा. मयुरी कांडर, डॉ. ए. पी. पाटील -माने, तसेच माजी विद्यार्थी अजय सातार्डेकर, प्रियांसी फाउंडेशन संस्था कोल्हापूरचे आकाश हनुमंत नाईक यांच्यासह असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment