विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून स्पर्धा परीक्षेची तयारी करावी - प्रदीप वरगावकर - चंदगड लाईव्ह न्युज

06 March 2025

विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून स्पर्धा परीक्षेची तयारी करावी - प्रदीप वरगावकर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     स्पर्धा परीक्षेमध्ये करिअर करण्यासाठी अचूक नियोजन व योग्य मार्गदर्शनाची नितांत गरज असून विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून स्पर्धा परीक्षेची तयारी करावी  असे आवाहन गडहिंग्लज येथील महाराष्ट्र प्रशासकीय सेवा कॉलेजचे मार्गदर्शक प्रदीप वरगावकर यांनी केले.

     ते चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा  व कॉमर्स विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते.

     वरगावकर मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, स्पर्धा परीक्षा क्षेत्रात विद्यार्थ्यांना अतिशय चांगली संधी आहे. त्यासाठी आपले ध्येय निश्चितीची गरज असून प्रयत्नपूर्वक  करून योग्य नियोजनाद्वारे या क्षेत्राकडे वळावे.  असे सांगून त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून असलेल्या वेगवेगळ्या संधी बाबत  सखोल असे मार्गदर्शन केले.

     यावेळी मार्गदर्शन करताना सौ. कीर्ती सावंत म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी आपल्या परिस्थितीचा बाऊ न करता कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी त्याच्याशी सामना करून आपले ध्येय साध्य करावे असे आवाहन केले.

     अध्यक्षीय भाषणात बोलताना प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वतःमधील क्षमता व  उणिवा  शोधून भविष्यकालीन संधी व आव्हाने यांचा विचार करून आपले ध्येय निश्चित करा, ध्येय साध्य करण्यासाठी वेळेचे अचूक नियोजन करा. स्वतःच्या कार्याचे सतत  मूल्यमापन करा व व नेहमी सकारात्मक रहा असे आवाहन केले.

     प्रारंभी समन्वयक डॉ. टी. ए. कांबळे यांनी प्रास्ताविक करून स्पर्धा परीक्षा  विभागाची माहिती सांगून चंदगड परिसरातील विद्यार्थ्यांच्या मध्ये अतिशय उच्च दर्जाची गुणवत्ता असून स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात आत्मविश्वासाने उतरल्यास व त्याला कष्टाची जोड दिल्यास निश्चितपणे यश संपादन करता येते असे सांगून त्यांनी  विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे जाणीवपूर्वक वळावे असे आवाहन केले.

     या कार्यक्रमाला डॉ. ए. वाय. जाधव, डॉ. एस. एस. सावंत, डॉ. जी. वाय. कांबळे, प्रा. आर. के. तेलगोटे, ज्ञानेश्वर सुतार यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समन्वयक डॉ. टी. ए. कांबळे यांनी आभार मानले. 

No comments:

Post a Comment