![]() |
दुर्गाडी डोंगराच्या पश्चिम भागात भर दुपारी लागलेल्या आगीमुळे असे धुराचे लोळ उसळले होते. |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील कल्याणपूर नजीक असलेल्या दुर्गाडी डोंगराच्या पश्चिम भागास आज दि. १८/३/२०२५ रोजी दुपारी मोठी आग लागली. भर दुपारी भडकलेल्या वनव्यात दुर्गाडी डोंगराच्या पश्चिमेकडील किणी, नागरदळे, हुंदळेवाडी गावच्या शेतकऱ्यांनी केलेल्या फळबागा व सामाजिक वनीकरण मधील झाडांचे मोठे नुकसान झाले आहे.
गतवर्षी याच काळात दुर्गाडी डोंगरास आग लागून कागणी व कल्याणपूर गावच्या शेतकऱ्यांची झाडे व गवतगंज्या यांचे मोठे नुकसान झाले होते. या आगीत चरण्यास गेलेली बकरीही होरपळून जखमी झाली होती. दरवर्षी डोंगराला लागणारे वनवे थांबवण्यासाठी शासन स्तरावरून वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक उपाययोजना करण्याची गरज निर्माण आहे.
काही दिवसांपूर्वी लागलेल्या वनव्यात दुर्गाडी डोंगराचा कल्याणपुरकडील भाग व डोंगरमाथा जळून खाक झाला होता. तर आज डोंगराच्या पश्चिमेकडे लागलेल्या आगीत शेतकऱ्यांनी जनावरांसाठी कापून ठेवलेल्या गवतगंज्या आंबा, काजू, चिकू, पेरू अशा फळझाडांच्या बागा आगीच्या भक्षस्थानी पडल्या आहेत.
डोंगर व जंगलांना वारंवार लागणाऱ्या अशा आग, वणव्यां मुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. यात छोटे मोठे जंगली प्राणी, पक्षी व त्यांची घरटी आगीत होरपळून जात आहेत. अशा वनव्यात जंगली प्राण्यांचा चारा जळून खाक होत असल्याने असे प्राणी पोटाच्या आगीसाठी शेतकऱ्यांच्या शिवारातील पिकांचे नुकसान करत आहेत. हे ओळखून शेतकऱ्यांनीच असे वणवे लागणार नाहीत यासाठी सामूहिकरीत्या शासन व प्रशासकीय विभागाला सहकार्य करण्यासाठी पुढे आले पाहिजे.
No comments:
Post a Comment