तेऊरवाडी मैदानात पै. सुरज मुंडे ने कर्नाटकच्या पै संगमेशला केले घुटना डावावर चितपट! 'सी एल न्यूज' वरील थेट प्रक्षेपणाचा कुस्ती शौकिनांनी घेतला लाभ - चंदगड लाईव्ह न्युज

07 April 2025

तेऊरवाडी मैदानात पै. सुरज मुंडे ने कर्नाटकच्या पै संगमेशला केले घुटना डावावर चितपट! 'सी एल न्यूज' वरील थेट प्रक्षेपणाचा कुस्ती शौकिनांनी घेतला लाभ

 

तेऊरवाडी कुस्ती मैदानाची काही क्षणचित्रे

तेऊरवाडी : सी एल वृत्तसेवा
   तेऊरवाडी, (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथे श्रीराम नवमी निमित्त रविवार दि. ६ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या कुस्ती मैदानात शाहू कुस्ती केंद्र कोल्हापूरचा पै. सुरज मुंडे याने डबल कर्नाटक केसरी पैलवान संगमेश बिराजदार याला दहाव्या मिनिटाला घटना डावावर चितपट केले. या कुस्तीसाठी पंच म्हणून शिवछत्रपती पुरस्कार विजेते महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर यांनी काम पाहिले.
  या कुस्ती मैदानाचे थेट प्रक्षेपण मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या 'सी एल न्यूज चॅनल' वर करण्यात आले होते. हजारो कुस्ती शौकिनांनी व क्रीडा प्रेमींनी आपल्या मोबाईल वरून याचा लाभ घेतला.
 कोवाड- तेऊरवाडी रोड वरील भोगण खडीमशीन नजीक झालेल्या कुस्ती मैदानाचे उद्घाटन मारुती बाळू पाटील, जानबा राजगोळकर, लक्ष्मण भिंगुडे, निवृत्ती पाटील, बाबू पाटील, सुबराव पाटील आदींच्या उपस्थितीत पार पडले. मैदानातील दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत कंग्राळीचा कर्नाटक चॅम्पियन कामेश पाटील यांने शाहू कुस्ती केंद्र कोल्हापूरच्या पै गणेश मुंडे याला पराभूत केले, तीन नंबरच्या कुस्तीत श्रीशैल पाटील (अथनी कर्नाटक) हा जखमी झाल्यामुळे पै विक्रम जाधव (शिनोळी) याला विजयी घोषित करण्यात आले. चार नंबरच्या कुस्ती सुनील करवते (कवठेपिरान) जखमी झाल्याने तेजस मोरे शाहू कुस्ती केंद्र याला विजयी घोषित करण्यात आले. याशिवाय राहुल आलदर (सांगली), ओमकार पाटील (राशिवडे), राजवर्धन पाटील (शाहू कुस्ती केंद्र), मोहन पाटील (शाहू कुस्ती केंद्र), रोहित चव्हाण (कवठेपिरान), विनायक येळ्ळूर, बाजीराव फिरंगे कोल्हापूर, जयवंत कडोली, मृणाल पाटील राशिवडे, विनायक दिंडे कवठेपिराण, ओमकार नाईक तुर्केवाडी, आकाश पुजारी निट्टूर, सिद्धार्थ पाटील राशिवडे यांनी प्रतिस्पर्ध्यांवर प्रेक्षणीय विजय मिळवले.
 मैदानाचे आकर्षण पहिल्या कुस्तीत कर्नाटक केसरी पार्थ पाटील (कंग्राळी) याने महाराष्ट्र चॅम्पियन विवेक लाड कोल्हापूर याला तर दुसऱ्या कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन शुभम पाटील (तेऊरवाडी) याने अजित पाटील (सांगली) याच्यावर प्रेक्षणीय विजय मिळवला. शुभम पाटील याला चांदीची गदा बक्षीस देण्यात आली.  दत्तू रामचंद्र गावडे (हरळी) यांच्या वतीने ठेवलेल्या जंगी मेंढ्याची कुस्ती पै कार्तिक जाधव (निट्टूर) याला चितपट करून विठ्ठल मोरे तुर्केवाडी याने जिंकली, तर शिवाप्पा सिद्धाप्पा धनगर (सलामवाडी) यांनी दिलेल्या जंगी मेंढ्याची कुस्ती पै राजू पाटील (शिनोळी) याने पै भूमिपुत्र (मुतगा) याला पराभूत करून जिंकली. उद्घाटनाच्या कुस्तीत पै विक्रांत पाटील (तेऊरवाडी) विजयी झाला. यावेळी झालेल्या महिला कुस्त्या मैदानाचे आकर्षण ठरल्या.
आखाडा पंच म्हणून लक्ष्मण पवार (मांडेदुर्ग), गावडू पाटील, भैरू पाटील (निट्टूर), प्रकाश दळवी, महादेव पाटील, शिवाजी पाटील (तेऊरवाडी) आदींनी काम पाहिले. कुस्त्यांचे धावते समालोचन रामदास गायकवाड (कवठेपिरान) यांनी केले. सूत्रसंचालन एम ए पाटील, एन व्ही पाटील,  एम बी पाटील यांनी केले. अक्षय आवळे घरगुती यांच्या हलगी पथकाने मैदानात चैतन्य निर्माण केले.
यावेळी माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, माजी जिप सदस्य कल्लाप्पाण्णा भोगण, शंकरराव मनवाडकर, अशोक जोतिबा पाटील, एम जे पाटील, चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, रामराव गुडाजी, वाय. बी. पाटील, पिंटू नाईक तुर्केवाडी आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment