ओलम साखर कारखाना नोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्यावे या मागणीचे निवेदन कारखाना प्रशासनाला देताना उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथे २० वर्षांपूर्वी हेमरस हा खाजगी साखर कारखाना सुरू झाला. या कंपनीने दहा वर्षे कारखाना चालवून नंतर आपल्या सोयीनुसार हा कारखाना ओलम या दुसऱ्या खाजगी कंपनीला विकला. गेली दहा-बारा वर्षे ही कंपनी कारखाना चालवत आहे. कारखाना सुरू करण्यापूर्वी सन २००३ मध्ये झालेल्या चंदगड येथील जन सुनावणीच्या वेळी हा कारखाना झाल्यास चंदगड तालुक्यातील भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिले जाईल, तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस प्राधान्याने उचलला जाईल, चांगला दर मिळेल, पर्यावरणावर कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत, वजनात पारदर्शकता राहील अशा अनेक आश्वासनांची खैरात करण्यात आली होती. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी परिसरातील ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणात समर्थन देत दौलत प्रशासनाचा विरोध डावलून हेमरस उभारणी उचलून धरली होती. तथापि काही वर्षातच या खाजगी कंपन्यांनी आपला स्वार्थी चेहरा दाखवायला सुरुवात केली. काही वर्षांपूर्वी कारखान्यात पाच पाच सहा वर्ष काम केलेल्या कामगारांना कोणतीच पूर्वसूचना न देता घाऊक नोकर कपात केली. यावर तत्कालीन शिवसेनेने आवाज उठवून या नोकरदारांना पुन्हा कामावर हजर करून घेण्यास प्रशासनाला भाग पाडले होते. यात तत्कालीन शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे तालुकाप्रमुख संजय पाटील यांनी महत्त्वाची भूमिका वठवली होती. तथापि पुन्हा कारखाना प्रशासन हळूहळू आपला अजेंडा राबवतच आहे. सध्या ही तिथे नोकरीत कायम नसलेल्या भूमिपुत्रांवर नोकर कपातीची टांगती तलवार कायम आहे. भागात सक्षम कामगार असूनही परप्रांतीयांची भरती सुरू आहे. यावरही शिवसेनेने वेळोवेळी आवाज उठवला आहे.
सद्यस्थितीत ही नोकर भरतीत स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांना डावलले जात आहे. असलेल्या नोकरांना पर्मनंट ऑर्डर न देणे अशा तक्रारी वाढल्याने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली सध्याच्या कारखाना प्रशासनाला दि. १४ एप्रिल २०२५ रोजी एक निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात नोकर भरती करताना स्थानिकांना प्राधान्य द्यावे, १०-१२ वर्षे काम करणाऱ्या नोकर वर्गाला पर्मनंट करून घ्यावे, विविध पदांवर कार्यरत असणारे कर्मचारी हे परप्रांतीय असल्याचे समजते. त्या शैक्षणिक पात्रतेचा उमेदवार भागात नसेल तरच इतरांचा विचार करावा, भविष्यात कारखान्यामार्फत नियोजित इथेनॉल प्रकल्पासाठी लागणारे कामगार म्हणून चंदगड, आजरा, गडहिंग्लज या भागातील बेरोजगार युवकांना संधी मिळावी. आदी मागण्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. कारखाना फायद्यात चालवण्यामध्ये भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा न जाऊ देता नोकरभरतीत प्राधान्य द्यावे. यात सुधारणा न झाल्यास भागातील शेतकरी व बेरोजगार तरुणांना घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. हे निवेदन उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली ओलमचे युनिट हेड संतोष देसाई यांना देण्यात आले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, चंदगड विधानसभा संपर्क प्रमुख राजू रेडेकर, पदाधिकारी विक्रम मुतकेकर, दिलीप माने, विष्णू गावडे, युवराज पोवार, अवधूत पाटील, दशरथ सुतार, नवला मनवाडकर, तुकाराम पाटील, पाच्छासोा काझी आदींसह भागातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment