चंदगड : सी एल वृत्तसेवा
मराठी विद्यामंदिर करेकुंडी (ता. चंदगड) या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार दि. १२ एप्रिल २०२५ रोजी उत्साहात पार पडले. 'एक हात मदतीचा, शाळेच्या विकासाचा' हे घोषवाक्य घेऊन आयोजित करण्यात आलेल्या स्नेहसंमेलन कार्यक्रम प्रसंगी ग्रामस्थांनी शाळेच्या प्रगतीसाठी सढळ हाताने आर्थिक मदत केली.
मराठी विद्या मंदिर करेकुंडीच्या क्रीडांगणावर संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यामंदिर होसुरचे मुख्याध्यापक व देव वैजनाथ शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन मनोहर नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी संभाजी चव्हाण, वैजू शिवाजी पाटील, सुभाष बाबाजी भोसले, अभिजीत जयराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमात इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत पालक व ग्रामस्थांची शाबासकी मिळवली. यावेळी शाळा व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे ५० पेक्षा अधिक ग्रामस्थांनी ५ हजार ते १२ हजार रुपयांचे देणग्या शाळेकडे सुपूर्द केल्या. सर्व देणगीदारांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक नरसू पाटील, विषय शिक्षक सोनाप्पा कोकितकर, अध्यापक रामलिंग तूपारे व सौ सीमा श्रीकांत पाटील या शिक्षकांसह शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment