![]() |
विष्णू गावडे यांना शिवबंधन बांधताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सोबत शिवसेनेचे नेते व पदाधिकारी |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी गावचे सुपुत्र व माजी सरपंच विष्णू गावडे यांनी नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. त्यांना दस्तूर खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हाती शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.
विष्णू गावडे हे तालुक्यात एक प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ते व लोकनियुक्त सरपंच म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या कार्यकाळात गावातील अंतर्गत रस्ते, वीज पथदिवे, अंगणवाडी बांधकाम, प्राथमिक शाळा बांधकाम सह कोट्यावधींची विकास कामे खेचून आणली. दलित वस्तीच्या स्मशानभूमीचा रखडलेला रस्ता तसेच अनेक पानंद रस्ते खुले करून दिले. पर्यावरणाला घातक असलेला व गावात अनधिकृत मंजूर केलेला बॉक्साइट उत्खनन प्रकल्प रद्द करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून तो रद्द केला. चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा येथे उभारण्यात आलेला एव्हीएच कोलटार सारखा पर्यावरणास हानिकारक प्रकल्प घालवण्यासाठी झालेल्या आंदोलनात आघाडीवर होते. या आंदोलनात त्यांनी आपल्या अंगावर अनेक केसेस घेतल्या व प्रकल्प हद्दपारीचा लढा यशस्वी केला. दौलत कारखान्यात वेळोवेळी होणाऱ्या आंदोलनात भाग घेऊन कामगार व शेतकऱ्यांना पगार व थकीत ऊस बिले मिळवून देण्यासाठी यशस्वी सहभाग घेतला. गावातील अनेक विकास कामे मंजूर करून ती पूर्णत्वास नेली. अडलेल्या नडलेल्या गरीब लोकांना मदत करण्यासाठी ते नेहमी अग्रेसर असतात. हिंदु हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार त्यांना पूर्वीपासूनच आवडायचे. सद्यस्थितीत बाळासाहेबांची वारसदार असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल त्यांनी हाती घेत या माध्यमातून सर्व सामान्य नागरिकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्याबरोबरच आगामी काळात पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याचे यावेळी सांगितले. विष्णू गावडे यांच्या शिक्षणाप्रतीक्षा प्रवेशामुळे चंदगड तालुक्यात उद्धव ठाकरे शिवसेनेची ताकद वाढीस लागणार हे मात्र नक्की.
पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना चंदगड विधानसभा क्षेत्रात पक्ष वाढीसाठी कार्य करण्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, चंदगड विधानसभा प्रमुख राजू रेडेकर, गडहिंग्लज तालुका प्रमुख दिलीपराव माने, आजरा तालुकाप्रमुख युवराज पवार, युवा सेना जिल्हाप्रमुख अवधूत पाटील आदी उबाठा शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment