चंदगड : सी एल वृत्तसेवा
शासकीय कर्मचाऱ्यांना प्रवासाचा त्रास होऊ नये म्हणून पाच दिवसाचा आठवडा करण्यात आला आहे. आठवड्यातील शनिवार व रविवार असे दोन दिवस सुट्टी असते. सध्या शासकीय कामकाजाच्या दिवशी कामाची वेळ सकाळी सव्वा नऊ ते सायंकाळी सव्वा सहा अशी असताना चंदगड तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयांत अपवाद वगळता अनेक खुर्च्या कार्यालयीन वेळेत रिकाम्याच दिसतात. त्यामुळे कामेवाडी, चिंचणे, राजगोळी, कुदनूर, कालकुंद्री, तुडये, हाजगोळी, अशा तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून शासकीय कामासाठी चंदगड येथे आलेल्या नागरिकांना रिकाम्या टेबल खुर्चीला नमस्कार करावा लागतो. शंभर (जाणे येणे) किलोमीटर अंतरावरून शेकडो रुपये व वेळ खर्च करून आलेल्या नागरिकांची कामे करण्याऐवजी नडवण्याचेच उद्योग जास्त चालतात. अशा कामचुकार व दांडी बहाद्दरांचा अतिरेक झाल्याने पत्रकार राहुल रामचंद्र पाटील (यशवंतनगर, ता. चंदगड) यांनी अशा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. या आशयाचे निवेदन गटविकास अधिकारी चंदगड यांना नुकतेच दिले आहे.
एकीकडे शासनाकडून गतिमान व लोकाभिमुख प्रशासनाच्या घोषणा दिल्या जात असताना कामाच्या वेळेत ओस पडलेली कार्यालये पाहता. ही बेबंदशाही थांबणार की नाही? असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. सकाळी साडेदहा वाजता कार्यालयात गेले तरी कर्मचारी खुर्चीत नसतो. यावेळी बाजूच्या टेबलचा कर्मचारी ते चहा प्यायला गेले आहेत. वगैरे कारणे ठोकून देतात. केव्हाही जा परिस्थितीनुसार चहाला गेलेत, जेवायला गेलेत, बाथरूमला गेलेत वगैरे कारणे ठरलेली आहेत. म्हणजे या कर्मचाऱ्यांना घरी चहा मिळतो की नाही? असा प्रश्न पडतो. दुपारी एक ते चार अशी यांची जेवणाची वेळ आहे. या काळात कर्मचारी कुठे गेला आहे? हे विचारायचीही सोय नाही. अर्ध्या तासाची जेवणाची वेळ त्यांनी केव्हाच धाब्यावर बसवली आहे. साडेतीन चार वाजता टेबलला येतात तेवढ्यात त्यांचा पुन्हा चहाचा वेळ होतो. ऑफिस सुटायच्या वेळी टेबलवरील साहित्य आवरा आवर करण्यासाठी ते येतात. यावेळी वाट पाहत बसलेल्या नागरिकांना आता वेळ झाला उद्या किंवा परवा या असे बेधडक सांगितले जाते. हा चंदगड तालुक्यातील नागरिकांचा रोजचा अनुभव आहे.
नागरिकांच्या वाढत्या तक्रारीवरून राहुल पाटील यांनी गटविकास अधिकारी यांना सदरचे निवेदन दिले असले तरी पहिल्यांदा अधिकाऱ्यांनी स्वतः कार्यतत्पर राहून नागरिक किंवा आपल्याच विभागातील सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांकडून चिरीमरीची अपेक्षा न बाळगता कार्य केले पाहिजे, तरच ते आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना नैतिक अधिकार वाणीने सांगू शकतील.
अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळणारे गलेलठ्ठ पगार सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत व्हावीत यासाठी नागरिकांकडून वसूल केलेल्या करातूनच दिले जातात. याचा विसर अनेकांना पडला आहे. तथापि याला अपवाद असणारेही अनेक कर्मचारी आहेत. ते वेळेत व आपल्याला नेमून दिलेली कामे वेळेत व नागरिकांकडून कोणतीही अपेक्षा न करता करत असले तरी दांडीबहादरांमुळे त्यांचीही बदनामी होत आहे.
राजकीय कार्यक्रम, यात्रा, जत्रा, कर्मचारी सेवानिवृत्ती कार्यक्रम, वाढदिवस, लग्न व खाजगी कार्यक्रम अशावेळी बरेच कर्मचारी रजा न भरता अनधिकृत गैरहजर राहतात असेही निवेदनात म्हटले आहे. जनहितार्थ व गतिमान लोकाभिमुख प्रशासन सारख्या उपक्रमांना चालना देण्यासाठी कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धडा शिकवावा. अशी मागणी करताना नागरिकांकडून कोणते सहकार्य अपेक्षित आहे. या याबाबतचा लेखी खुलासा राहुल पाटील यांनी गटविकास अधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे मागितला आहे.
No comments:
Post a Comment