वादळामुळे कर्यात भागाला धडकी, अनेक घरांचे पत्रे उडाले, झाडे कोसळली, वाहतूक ठप्प, नागणवाडीत झाड कोसळल्याने कार गाडी चक्काचूर - चंदगड लाईव्ह न्युज

26 April 2025

वादळामुळे कर्यात भागाला धडकी, अनेक घरांचे पत्रे उडाले, झाडे कोसळली, वाहतूक ठप्प, नागणवाडीत झाड कोसळल्याने कार गाडी चक्काचूर


चंदगड : सी एल वृत्तसेवा 
   चंदगड तालुक्याच्या पूर्वेकडील कर्यात भागात आलेल्या वादळी वाऱ्याने सर्वत्र हाहाःकार उडवला. वादळाचा वेग इतका होता की वादळाने थोड्याच वेळात पूर्ण तालुका व्यापून टाकला. पावसाचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी या वादळामुळे भागात आंबा फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान वादळा सोबत आलेला पाऊस शेतीच्या अंतर मशागतीसाठी पोषक ठरणारा आहे.

     गेले आठ दिवस कर्यात भागाला दुपारनंतर रोज वादळाचा तडाखा बसत आहे. तथापि आज दि २५/४/२०२५ रोजी दुपारी साडेतीन नंतर आलेल्या वादळाने अक्षरशः कहर केला. यात अनेक घरांवरील लोखंडी तसेच सिमेंट पत्र्यांचे छप्पर उडून गेले, घरावरील मंगलोरी कौले उडून गेली, नुकत्याच रचलेल्या मोठमोठ्या गवतगंज्या कोसळल्या व त्यानंतर आलेल्या पावसाने पिंजर भिजून शेतकऱ्यांनी जनावरांसाठी साठवून ठेवलेल्या चाऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागा विशेषतः आंबा फळे वादळामुळे झडून पडल्याने उत्पादनात ५० ते ६० टक्के घट येणार आहे. याचबरोबर केळींची झाडे पडून मोठे नुकसान झाले आहे. 
  कागणी ते कोवाड मार्गावर सामाजिक वनीकरण विभागाने लावलेली झाडे गेल्या दहा वर्षात राजरोसपणे बुंध्यातून जळाली जात आहेत. ही झाडे जळून कमकुवत झाल्याने या वादळात मोडून पडत आहेत. येथे वादळ किंवा विविध प्रसंगी कोसळलेली झाडे पळवून  नेण्यासाठी टपलेली यंत्रणाच कार्यान्वित झाल्याचे दिसते. तथापि यावर सामाजिक वनीकरण अथवा बांधकाम व कोणत्या शासकीय विभागाचा वचक राहिलेला नाही. यामुळे झाडे जाणारे व तोडून चोरून तोडणारे आपली कामे बिनधास्त करत आहेत. वादळ प्रसंगी हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळाच बनला आहे. याच मार्गावर आज कोवाड स्टॅन्ड नजीक निलगिरीचे मोठे झाड  कोसळले. झाड कोसळताना तिथून जाणारी कार व कारचालक बालंबाल बचावला. रस्त्यात झाड आडवे पडल्यामुळे आजरा, गडहिंग्लज कोवाड कडून बेळगाव, कालकुंद्री कुदनुर कडे जाणारी वाहतूक काही काळ प्रभावित झाली होती. 
  दुसरीकडे कदनूर व कालकुंद्री मार्गावरही ऑस्ट्रेलियन बाभूळ चे मोठे झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. रात्र होईपर्यंत हे झाड हटवण्याच्या कोणत्याच हालचाली दृष्टीपथात नव्हत्या. परिणामी  कागणी, कालकुंद्री, कुदनूर, राजगोळी  दड्डी हत्तरगी राष्ट्रीय महामार्गाकडे जाणारी वाहतूक, भागातील दूध व अन्य वाहतूक ठप्प झाली आहे.

No comments:

Post a Comment