ढोलगरवाडी सर्पोद्यान च्या मान्यतेसाठी फेर प्रस्ताव सादर न केल्यास कायमची बंदी...? प्राणी संग्रहालय प्राधिकरण - चंदगड लाईव्ह न्युज

21 May 2025

ढोलगरवाडी सर्पोद्यान च्या मान्यतेसाठी फेर प्रस्ताव सादर न केल्यास कायमची बंदी...? प्राणी संग्रहालय प्राधिकरण

आद्य सर्पमित्र कै. बाबुरव टक्केकर यांचे चिरंजीव सर्पमित्र संदीप टक्केकर यांनी गतवर्षी पार्ले येथे पकडून रेस्क्यू केलेला महाकाय किंग कोब्रा. (संग्रहित छायाचित्र)

चंदगड : श्रीकांत पाटील/ सी एल वृत्तसेवा 

    पर्यावरण साखळीतील सर्वोच्च स्थानी असलेल्या सापांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेल्या ढोलगरवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर येथील सर्पालयाची मान्यता केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने ५/१/२०२२ रोजी आदेश देत रद्द केली होती. ती पुनर्स्थापित करण्यासाठी तसेच येथे सर्प बचाव केंद्र (रेस्क्यू सेंटर) बहाल करण्यासाठी फेर प्रस्ताव सादर करावा. असा आदेश मुख्य वनसंरक्षक तथा सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरण नागपूर यांनी नुकताच दिला आहे.

    ढोलगरवाडी येथील शेतकरी शिक्षण मंडळाच्या मामासाहेब लाड विद्यालयाला जोडून शिक्षण मंडळाचे संस्थापक तथा आद्य सर्पमित्र गुरुवर्य बाबुराव टक्केकर यांनी गाव व परिसरातील ग्रामस्थांचा तीव्र विरोध डावलून विद्यालयाशी संलग्न सर्पालय सुरू केले.  सन १९६६ मध्ये सुरू केलेल्या सर्पालय च्या माध्यमातून त्यांनी हजारो सापांना जीवदान दिले.  गेली ५८ वर्षे 'साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे' हे पटवून देत नागपंचमी च्या निमित्ताने पर्यावरण प्रेमी व भाविकांना सापाबद्दलची शास्त्रोक्त माहिती देण्याचे कार्य जे शासनाने केले पाहिजे ते टक्केकर यांच्यानंतर मामासाहेब लाड विद्यालय व वाघमारे सट्टूप्पा टक्केकर ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी पदरमोड करून सुरू ठेवले आहे. या विद्यालयात शिकून बाहेर पडलेले हजारो विद्यार्थी व विद्यार्थिनी आज सर्पमित्र म्हणून जगाच्या कानाकोपऱ्यात वावरत आहेत.  केवळ भीतीपोटी मारले जाणाऱ्या लाखो सापांचे जीव यांच्या माध्यमातून वाचले आहेत.  बाबुराव टक्केकर यांनी १९७२ मध्ये अंमलात आलेल्या वन्यजीव संरक्षण कायद्याच्या ६ वर्षे आधी पासून सर्प प्रबोधनाचे हे काम सुरू केले आहे. मात्र १९७२ मध्ये स्थापन झालेल्या केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने वन्यजीव संरक्षण अधिनियम (वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन ॲक्ट)   च्या सेक्शन ६ मधील 38 H च्या नियमानुसार ढोलगरवाडी येथील सर्पालय बंद करण्याचे आदेश ५ जानेवारी २०२२ रोजी जारी केले. यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील पर्यावरण व सर्प प्रेमींमध्ये एकच खळबळ उडाली. 

  ही रद्द केली केलेली मान्यता पुन्हा बहाल व्हावी यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी वाघमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या तीनचार वर्षांत कोल्हापूर, बेळगाव व गोवा राज्यातील खासदार, आमदार, मंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांची शिफारस पत्रे घेऊन संबंधित विभागांचे उंबरे झिजवले. ढोलगरवाडी येथील केंद्र अबाधित ठेवून याच्या संवर्धनासाठी निधी व जमिनीची मागणी केली. तरी याला दोन वेळा मुदतवाढ मिळण्यापलीकडे म्हणावे तसे यश आले नव्हते. मात्र तानाजी वाघमारे यांच्य धडपडीची दखल घेत डॉ. किशोर एस. मानकर मुख्य वनसंरक्षक तथा सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरण नागपूर यांच्या कार्यालयाकडून रद्द केलेले बचाव केंद्र (रेस्क्यू सेंटर) नव्याने सुरू करायचे असेल तर संचालक स्नेक पार्क ढोलगरवाडी यांनी त्याबाबतचा प्रस्ताव नव्याने सादर करावा. तपासणीअंती हा प्रस्ताव शिफारशी सह प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव तथा मुख्य वन्यजीव रक्षक यांचेमार्फत केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण यांना सादर करण्यात येणार असून केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण कडून बचाव केंद्रास अंतिम मान्यता दिली जाईल. तोपर्यंत केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण यांचे परवानगीशिवाय स्नेक पार्क येथे साप किंवा अन्य कोणतेही प्राणी ठेवू नयेत असे आदेश देण्यात आले आहेत. 

  एकंदरीत महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील वनविभाग, पोलीस, आर्मीचे जवान, वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक, सर्प संशोधक यांच्यासाठी मार्गदर्शनाचे एक महत्त्वाचे केंद्र ठरलेल्या ढोलगरवाडी येथील सर्प शाळा टिकणे ही काळाची गरज आहे. ही सर्प शाळा मोठ्या प्रमाणावर विकसित झाल्यास चंदगड तालुक्यातील पर्यटनासाठी आणखी उभारी मिळेल. त्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, सर्व ग्रामपंचायती, आमदार, खासदार व जिल्ह्याशी संबंधित मंत्री, सर्व विभागांची अधिकारी यांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा आद्य सर्पमित्र बाबुराव टक्केकर यांनी आपली उभी हयात पणाला लावून महत्प्रयासाने उभे केलेले सर्प प्रबोधन व संशोधन केंद्र कायमचे इतिहास जमा व्हायला वेळ लागणार नाही.

No comments:

Post a Comment