![]() |
चोरलेला कॅमेरा व मुद्देमालासह चोरटा गौतम निकम सोबत पाटणे वन विभागाचे रेंजर प्रशांत आवळे व वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
तुर्केवाडी (ता. चंदगड) हद्दीतील जंगलात वन्य प्राण्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी पाटणे वनविभागाकडून टॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. यातील निसर्ग पायवाटेवर लावण्यात आलेला कॅमेरा वन विभागाच्या गस्तीपथकाला चोरीस गेल्याचे आढळले. याबाबत तपास केला असता या घटनेतील चोरटा गौतम सुभाष निकम रा. तुर्केवाडी (ता. चंदगड) हा असल्याचे निष्पन्न झाले. वनविभागाच्या पथकाने तात्काळ हालचाली करून त्याला झडप घालून मुद्देमालासह रंगे हाथ पकडले. चंदगड न्यायालयापुढे हजर केले असता त्याला दोन दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पाटणे परिक्षेत्र वन कार्यालयाकडून मिळालेली अधिक माहिती अशी, पाटणे परिक्षेत्रातील परिमंडळ तुडये मधील हाजगोळी नियत क्षेत्रामधील तुर्केवाडी हद्दीत जंगल क्रमांक ९७ मध्ये दिनांक ११ मे २०२५ रोजी सकाळी गस्त घालत असताना निसर्ग पाऊलवाटेवर लावलेला ट्रॅप कॅमेरा चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. यावरून तपास केला असता सदर ट्रॅप कॅमेरा आरोपी गौतम सुभाष निकम, रा. तुर्केवाडी याने चोरल्याचे निष्पन्न झाले. त्याला शिताफिने पकडून आरोपीची पुढील चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला.
हा कॅमेरा एका पोत्यात भरून घराजवळ ठेवल्याचे सांगितले. वन पथकाने पोत्याचा शोध घेऊन तपासले असता या पोत्यात फुटलेल्या अवस्थेतील कॅमेरा, या सोबत माकड या वन्य प्राण्यांच्या मांसाचा सुकलेला तुकडा, शिकारीचे ४ फासके (सापळे), सांबर या वन्य प्राण्यांची ५ शिंगे, घार ल लांडोर यांची पिसे, शिकारीसाठी वापरण्यात येणारी बाणांची लोखंडी पाती असे आक्षेपार्ह साहित्य आढळून आले. सर्व साहित्य जप्त करून चोरट्यास ताब्यात घेतले. वनरक्षक हाजगोळी त्यांचे कडील रिपोर्ट नुसार गुन्हा नोंद करून प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी चंदगड यांचे समोर हजर केले असता आरोपीस दोन दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास वनसंरक्षक कोल्हापूर जी गुरुप्रसाद, सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटणे वनपरिक्षेत्र अधिकारी वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे, वनपाल बाळासाहेब भांडकोळी, वनरक्षक मेघराज घुले, प्रकाश मारुती शिंदे, सचिन आडसूळ, श्रेयश रायके, खंडू कातकडे, पांडुरंग कुलाळ, खंडू कोरे, अमित माने, पास्कल डिसोजा, वाहन चालक विश्वनाथ नार्वेकर व शुभम बांदेकर यांच्या सह वन्यजीव बचाव पथक हाजगोळी हे पथक कार्यरत आहे.
No comments:
Post a Comment