![]() |
बेकिनकेरे : उचगाव मार्गावरील चाळोबा गणेश हत्ती कडून मोडतोड केलेली कार. |
सी. एल. वृत्तसेवा :
(कालकुंद्री / श्रीकांत पाटील, कोवाड / संजय पाटील)
कोवाड _ बेळगाव रस्त्यावर बेकिनकेरे ते उचगाव यादरम्यान रस्त्या शेजारी असणाऱ्या घरासमोर पार्क केलेल्या कारवर चाळोबा गणेश हत्तीने जोरदार हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सदर चार लाख रुपयांची स्विफ्ट डिझायर कार काही क्षणातच स्क्रॅपमध्ये गेल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. 16 मे) मध्यरात्री नंतर घडला. सदर कार ही निटूर (ता. चंदगड) येथील सचिन रामचंद्र पाटील (सध्या रा. गुगल सर्कल, मडगाव, गोवा) यांच्या मालकीची आहे. त्यांची पत्नी स्मिता पाटील या आपल्या मुलांच्या शाळेला सुट्टी असल्याने आपल्या माहेरी बेकिनकेरे येथे गेल्या होत्या.
सचीन हे आपल्या पत्नी व मुलांना आणण्यासाठी गोवा येथून शुक्रवारी सायंकाळी आले होते. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता कार पार्क करून झोपी गेल्यानंतर रात्री एक नंतर सदर हत्तीकडून हा प्रकार घडला आहे. सदर हत्ती हा गत महिनाभरापासून महिपाळगडच्या जंगला शेजारी विसावला आहे. मध्यरात्रीनंतर थेट जंगला शेजारी असणाऱ्या बेकिनकेरे, अतिवाड व बसुरते या गावांच्या शिवारात फेरफटका मारत आहे. गत दहा वर्षापासून तो आजरा येथील चाळोबा जंगलात होता. महिनाभरापासून तो बेळगाव तालुक्याच्या सीमेवर आला आहे.
या हत्तीने जोरदार हल्ला चढवला, काही वेळातच सदर कारला पायांनी दाबून तसेच सुळे मारून सदर कार ही फुटबॉल सारखी खेळवली आहे. या कारच्या पत्र्याला सुळे मारल्याने काही ठिकाणी पत्र्याला छिद्रे पडली आहेत. तर वायरिंग, काचा, बोनेट, संपूर्ण वरचा पत्रा पूर्णपणे निकामी केले आहेत. शनिवारी सकाळी घराबाहेर पडल्यानंतर पहाटे सहा वाजता सदर घटना त्यांच्या लक्षात आली. यानंतर बेळगाव वन खात्याच्या अधिकाऱ्याना याची कल्पना देऊन पंचनामा करण्यात आला.
बेकिनकेरे ते उचगाव मार्गावर बेकिनकेरे
गावाशेजारी डॉ. निरंजन कदम यांचे घर आहे. त्यांचे मेव्हणे सचिन पाटील हे त्यांच्याकडे घरी आले असता सदरची घटना घडली आहे.
या घटनास्थळापासून जवळच असलेल्या संभाजी धाकलू कदम यांच्यासह किरण राजाराम कदम या दोन शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्लास्टिक टाक्या फोडून टाकल्या आहेत. तसेच उसाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
हॉटेलवर हल्ला, डी फ्रीज फोडून पन्नास हजार रुपयांचे नुकसान.......
महिनाभरापासून या चाळोबा गणेश हत्तीचा बेकिनकेरे या गावामध्ये धुमाकूळ सुरू आहे. आठ दिवसापूर्वी याच गावाशेजारील एका हॉटेलमध्ये पाठीमागील बाजूने जाऊन सोंडीने डी फ्रीज बाहेर काढून फोडून टाकले. या घटनेत पन्नास हजार रुपयांचा फटका त्या हॉटेल मालकाला बसला आहे. अलीकडील काही दिवसात काही दुचाकींचे नुकसान केले आहे. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
No comments:
Post a Comment