![]() |
ए. सी. बिराजदार |
चंदगड : श्रीकांत पाटील / सी एल वृत्तसेवा
दिवाणी व फौजदारी न्यायालय चंदगडचे माजी न्यायाधीश ए. सी. बिराजदार यांची 'दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर' या पदावर नुकतीच पदोन्नती झाली आहे. २०२३ पासून ते पुणे जिल्हा न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. न्यायाधीश होऊ इच्छिणाऱ्या वकिलांसाठी व्याख्यानातून मार्गदर्शन करणारे तज्ञ म्हणून न्यायालयीन क्षेत्रात ते परिचित आहेत. त्यांना नुकत्याच मिळालेल्या बढतीमुळे त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
ग्रामीण व शहरी भागात एक कर्तव्यदक्ष न्यायाधीश म्हणून ओळख असलेल्या, घराण्यातील दोन पिढ्यांचा वकिलीचा पारंपारिक वारसा लाभलेल्या 'अमृत चंद्रकांत बिराजदार' यांना मिळालेल्या वरिष्ठ स्तरावरील पदोन्नतीच्या निमित्ताने त्यांच्याविषयी थोडेसे....
अमृत बिराजदार यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राजूर, ता. दक्षिण सोलापूर (जि. सोलापूर) व इयत्ता ५ वी पासूनचे शिक्षण सिध्देश्वर प्रशाला, सोलापूर येथे झाले. मे १९९४ मध्ये १० वी पास झाल्यानंतर ११ वी ते पदवीपर्यंतचे शिक्षण संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर येथे घेतले.
१९९९ मध्ये राज्यशास्त्र विषयात कला शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर डी. जी. बी. दयानंद विधी महाविद्यालय, सोलापूर येथे प्रवेश घेतला. मे २००२ मध्ये विधीपदवी प्राप्त केली. विधी पदवीचे शिक्षण घेत असताना दिवाणी प्रक्रिया संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता व मसुदा लेखन व दस्तऐवज लेखन या विषयांमध्ये महाविद्यालयात त्यांचा प्रथम क्रमांक ठरलेला असायचा. वकिलीची पदवी घेतल्यानंतर महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलवर नोंदणी करून जून २००२ पासून जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे वकीली सुरू केली. वकीली करत असताना अनेक दिवाणी, फौजदारी, ग्राहक हक्क विषयक, कामगार व औद्योगिक, महसूल व सहकारी खटल्यांमध्ये काम पाहिले. सुमारे २५० गृह चौकशी प्रकरणांमध्ये व्यवस्थापन प्रतिनिधी, कामगार प्रतिनिधी व चौकशी अधिकारी म्हणून काम पाहिले. उस्मानाबाद (आताचे धाराशिव), लातूर, पुणे, सातारा व मुंबई येथेही वकिली केली आहे.
जानेवारी २०१२ मध्ये न्याय सेवेतील पहिली नियुक्ती जळगाव न्यायालयात झाली. तेव्हापासून त्यांनी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून अमळनेर, पातूर (जि. अकोला), अकोला मुख्यालय, चंदगड (जि. कोल्हापूर) येथे सेवा बजावली.
न्यायाधीशांच्या तीन वर्षांत अन्यत्र बदल्या होत असतात. तथापि बिराजदार साहेब यांना कोरोनामुळे चंदगड न्यायालयात पाच वर्षे सेवा करण्याची संधी मिळाली. ही 'ग्रामदैवत रवळनाथाची कृपा' असे ते आवर्जून सांगतात. चंदगड येथे कार्यरत असताना लोक अदालत च्या माध्यमातून ४०-५० वर्षे प्रलंबित असलेले शेकडो दिवाणी खटले त्यांनी चुटकीसरशी मिटवून टाकले होते. अशा खटल्यातील वर्षानुवर्षे कोर्टाचे हेलपाटे मारून कंटाळलेले अनेक पक्षकार त्यांना आजही धन्यवाद देताना दिसतात. न्यायालयाच्या चाकोरी बाहेर जाऊन त्यांनी तालुक्यातील विविध शासकीय अधिकारी, पत्रकार यांना मार्गदर्शन केले. न्यायमूर्ती बिराजदार यांच्या संकल्पनेतून साकार झालेली चंदगड तालुका पत्रकार संघ आयोजित 'पत्रकार- ऑफिसर्स क्रिकेट चषक' ही शासकीय, निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी असलेली क्रिकेट स्पर्धा सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे. या स्पर्धेत सर्व शासकीय विभागांच्या संघांबरोबरच असणाऱ्या चंदगड न्यायालयाच्या टीम मधून ते उत्साहाने फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण करायचे. खेळाच्या वेळी अधिकाऱ्यांपासून शिपायापर्यंत सर्वांना ते 'रिस्पेक्ट' द्यायचे. यामुळे चंदगड मधील शासकीय, अधिकारी व पत्रकार मंडळींमध्ये त्यांच्याविषयी एक आदरयुक्त व मित्रत्वाची भावना निर्माण झाली होती. चंदगड तालुक्यातील नैसर्गिक साधन संपत्ती, पारगड, कलानिधीगड सह सर्व ऐतिहासिक किल्ले, तिलारी परिसरातील धबधबे व निसर्ग संपन्नता, धार्मिक स्थळे यांच्या आकर्षणामुळे ते अधिकारी व पत्रकारांसोबत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पुढाकार घ्यायचे.
विविध क्षेत्रातील चौफेर गाढा अभ्यास यामुळे भाषण करताना 'अमृत' या नावाप्रमाणेच त्यांच्या वाणीमध्ये अमृतमय गोडवा आणि भारदस्तपणा होता. त्यामुळे ते बोलत असताना श्रोते मंत्रमुग्ध होत. त्यांच्या सन २०१८ ते २३ या चंदगड मधील कार्यकाळातील अनेक आठवणी तत्कालीन अधिकारी व पत्रकारांनी जतन करून ठेवल्या आहेत.
मोटार वाहन न्यायालय, पुणे येथे कार्यरत असतानाच त्यांना 'दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर' पदी मिळालेल्या पदोन्नती बद्दल त्यांचे चंदगड तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी व सर्व सदस्य तसेच चंदगड तालुक्यातील आजी-माजी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत अभिनंदन व पुढील देदीप्यमान वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...!
No comments:
Post a Comment