विविध मागण्यांसाठी कृषी सहाय्यकांचे चंदगड येथे कार्यालयासमोर धरणे आंदोलन, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

07 May 2025

विविध मागण्यांसाठी कृषी सहाय्यकांचे चंदगड येथे कार्यालयासमोर धरणे आंदोलन, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

 


चंदगड : सी एल वृत्तसेवा 

   आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी चंदगड तालुक्यातील कृषी सहाय्यकांनी चंदगड कृषी सहाय्यक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी आपल्या मागण्याबाबतच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नावाने कृषी कार्यालयाकडे निवेदन देण्यात आले. 

   या निवेदनातील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी. कृषी सहायकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करावे. कृषी विभागातील संपूर्ण कामकाज डिजिटल स्वरूपात होत असताना कृषी सहाय्यकांना लॅपटॉप दिला जात नाही तो देण्यात यावा. कृषी सहायकांना ग्रामस्तरावर कामकाजासाठी मदतनीस द्यावा. कृषी विभागाच्या आकृती बंधास तात्काळ मंजुरी द्यावी, त्यामध्ये कृषी पर्यवेक्षक पदे वाढवून कृषी सहायकांच्या पदोन्नती मधील कुंठीत अवस्था दूर करावी व महसूल विभागाप्रमाणे आकृतीबंध करावा. कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक यांचे प्रमाण 1/4 करावे. आदी ११ मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे. हे आंदोलन ५ मे २०२५  पासून सुरू झाले असून रोज आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा संघटनेचे पदाधिकारी विलास रीढे, वसंत जारिकोटे, महेंद्र गजभिये आदींनी दिला आहे.

No comments:

Post a Comment