![]() |
बँक ऑफ महाराष्ट्र कोवाडचे शाखाधिकारी भूषण बागुल यांना निवेदन देताना व्यापारी संघटनेचे सदस्य |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
आपल्या लोकाभिमुख ग्राहकाभिमुख, दर्जेदार व आपुलकीच्या सेवेमुळे दोन वर्षांपूर्वी संपूर्ण देशातील ६६२ शाखांमध्ये दुसरा क्रमांक पटकावलेली बँक ऑफ महाराष्ट्रची कोवाड शाखा सध्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे चर्चेत आली आहे. तीनचार महिन्यांपूर्वी येथील दोन कर्मचारी कमी झाल्यामुळे त्यांचा भार उर्वरित कर्मचाऱ्यांवर पडत आहे. येथील गर्दी पाहता अजून तीन काउंटर उघडण्याची गरज असताना बदली होऊन गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी दुसऱ्या कर्मचाऱ्या ंची भरती झालेली नाही. त्यातच शासनाच्या विविध योजनांसह मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांची होत असलेली प्रचंड गर्दी यामुळे सकाळी १० वाजल्यापासून ५ वाजेपर्यंत बँकेत तुडुंब गर्दी असते. या गर्दीमुळे पाच मिनिटाच्या कामासाठी अर्धा दिवस थांबावे लागत असल्याने महत्त्वाचे ग्राहक अन्य बँकांकडे वळत आहेत.
अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अधिकारी व कर्मचारी ग्राहकांच्या रोषाला बळी पडत आहे. बँकेच्या कार्यक्षेत्रात कोवाड ही मोठी बाजारपेठ, शाळा कॉलेजमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शन, शेतकरी योजना तसेच परिसरातील ४० गावामधील मोठा ग्राहकवर्ग या बँकेशी जोडला गेलेला आहे. गेल्या काही दिवसात वाढत्या ग्राहक संखेमुळे पैसे काढण्यासाठी किंवा भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांची रांग रस्त्यापर्यंत येऊन लागत आहे. यावेळी अधिकारी व ग्राहक यांच्यातील वादावादीचे प्रसंग नित्याचे बनले आहेत. एक परिवार एक बँक हे ब्रीद असलेली बँक आता एक काम दिवसभर थांब. अशी अवस्था झालेली आहे.
ग्राहकांना होणाऱ्या या त्रासाची दखल घेऊन आठ दिवसात कर्मचारी संख्या न वाढवल्यास कोवाड व्यापारी संघटनेच्या वतीने शाखेला टाळे ठोकू असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. व्यापारी संघटने कडून हे निवेदन शाखा व्यवस्थाप भूषण बागुल यांनी स्वीकारले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दयानंद सलाम, उपाध्यक्ष कल्लाप्पाना वांद्रे, विवेक पाटील, चंद्रकांत कुंभार, बापू व्हन्याळकर, विक्रम पेडणेकर, अनिल भोगण, रोहित जाधव, हणमंत पाटील, पुंडलिक लाड, विनायक पोटेकर, उत्तम मुळीक आधी व्यापारी संघटनेचे सदस्य व ग्राहक उपस्थित होते.
हीच अवस्था कोवाड येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेची असून तिथेही पाच मिनिटांच्या कामासाठी तीन चार तास थांबण्याची वेळ ग्राहकांवर आली असून "मुकी बिचारी कोणी हाका" अशी अवस्था कोवाड परिसरातील ग्राहकांची झाली आहे. तथापि यात सुधारणा न झाल्यास ग्राहकांचा उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही.
No comments:
Post a Comment