६ जून रोजी पारगड किल्ल्यावरील शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्धार - चंदगड लाईव्ह न्युज

02 June 2025

६ जून रोजी पारगड किल्ल्यावरील शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्धार

पारगड किल्ल्यावरील शिवराज्याभिषेक सोहळा संग्रहित छायाचित्रे

कार्वे : सी एल वृत्तसेवा

       मजरे कार्वे येथील शहीद जवान वेलफेअर फाउंडेशन, पारगड ग्रामस्थ, चंदगड, आजरा, गडहिंग्लज सह बेळगाव सीमा भागातील शिवभक्तांच्या उपस्थितीत दरवर्षी ६ जून रोजी साजरा होणारा शिवराज्याभिषेक आनंदोत्सव सोहळा उत्साहात संपन्न करण्याचा निर्धार करण्यात आला. 

         मजरे कार्वे येथील महात्मा फुले विद्यालयात झालेल्या शिवभक्तांच्या व्यापक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरवर्षीप्रमाणे पारगड येथे ५ व ६ जून रोजी रायगड येथील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या धरतीवर पारगड येथे राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतो. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ५ रोजी गड स्वच्छता ,गड पूजन, गोंधळ, शिव शाहीरांचे पोवाडे, जागर तर ६ रोजी शस्त्रास्त्र प्रात्यक्षिके, हलगी वादन, पोवाडे, शिवचरित्रावरील व्याख्याने असे विविध कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केले जातात. भंडारा उधळण व शिवराज्याभिषेक सोहळा रायगडाच्या धर्तीवर येथे संपन्न केला जातो. असेच कार्यक्रम यावर्षी सुद्धा आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांच्या निमित्ताने उपस्थित सर्व धारकऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी कष्ट घ्यावेत. एकाही शिवभक्ताची गैरसोय होऊ नये. गडावर कुठेही प्लास्टिक,कचरा पडू नये यासाठी खबरदारी घ्यावी. असा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी कार्वेचे सरपंच शिवाजीराव तुपारे होते. स्वागत उपसरपंच पांडुरंग बेनके यांनी केले. प्रास्ताविक निवृत्ती हारकारे यांनी करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. होऊ घातलेल्या कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. यावेळी शिवचरित्राचे गाढे अभ्यासक पराग निटूरकर, खेडूतचे संचालक एम एम तुपारे व गडहिंग्लजचे शिवभक्त दयानंद शेंडगे यांनी सूचना मांडल्या. यावेळी देवाप्पा बोकडे, नारायण तेजम, दत्तू हारकारे यांच्यासह चंदगड, आजरा, गडहिंग्लज, सीमा भागातून शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. नारायण गडकरी यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment