चंदगड / सी एल वृत्तसेवा |
चंदगड हेरे मार्गावर मोहनतळे नजीक दुचाकीला अचानक गवि रेडा येऊन धडकल्याने पार्ले (ता. चंदगड) येथील चालक नंदू म्हातारू कांबळे जखमी झाले. शनिवार (३१) रोजी सकाळी सात वाजता ही घटना घडली. जखमी नंदू कांबळे यांना वन विभागाच्या मदतीने त्यांना गडहिंग्लज येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, नंदू कांबळे हे चंदगडला सकाळी कामानिमित्त घरातून बाहेर पडले होते. मोहन तळे नजीक आल्यानंतर जंगल परिसरातील झुडपातून एक गविरेडा अचानक जोरात रस्त्यावर आडवा आला. त्याला त्यांची दुचाकी धडकली. आणि नंदू कांबळे हे मोटरसायकल वरून जमिनीवर पडले. गवी रेडा निघून गेला. त्याचवेळी या मार्गाने वाहतूक करणारी अनेक मंडळी नंदू कांबळे यांना मदतीला धावले. संबंधित घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानंतर वनपाल कृष्णा डेळेकर यांनी घटनास्थळावर धाव घेतली. संबंधित जखमी व्यक्तीला चंदगड येथे ग्रामीण रुग्णालयात उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी गडहिंग्लज येथे पाठवण्यात आले. नंदू कांबळे यांना डोकीला जखम झाली असून शरीरालाही इजा झाली आहे. या मार्गाने प्रवास करताना प्रवाशांनी काळजी घ्यावी असे आवाहन वन विभागाने केले आहे.
No comments:
Post a Comment