कुदनूर- दुंडगे ते दुंडगे फाटा मार्गावर जीवघेण्या चरी, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष - चंदगड लाईव्ह न्युज

24 June 2025

कुदनूर- दुंडगे ते दुंडगे फाटा मार्गावर जीवघेण्या चरी, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

दुंडगे ते दुंडगे फाटा मार्गावर अशा प्रकारच्या जीवघेण्या चरी अपघातांना आमंत्रण देत आहेत.

कुदनूर : सी एल वृत्तसेवा 

       कुदनूर (ता. चंदगड) पासून दुंडगे गावातून कोवाड नेसरी मार्गावरील दुंडगे फाटा पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून पाईपलाईन किंवा अन्य कारणांसाठी रस्त्यात खुदाई केलेल्या चरी वाहनधारकांसाठी जीवघेण्या ठरत आहेत. तथापि याकडे दुंडगे ग्रामपंचायत किंवा संबंधित बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. 

      राजगोळी खुर्द व बुद्रुक, तळगुळी, कुदनूर, किटवाड आदी गावांसह कर्नाटकातील कुरिहाळ, हंदिगनूर, कडोली पासूनच्या परिसरातील सर्व गावांतील वाहनधारक व प्रवाशांना नेसरी, आजरा, अडकूर अशा ठिकाणी जाण्यासाठी हा मार्ग सोयीस्कर व जवळचा आहे.  तो कोवाड- कामेवाडी मार्गावरील दुंडगे गावातून कोवाड, तेऊरवाडी, नेसरी रस्त्यावरील वीज मंडळ कार्यालयाजवळ दुंडगे फाटा येथे जोडतो. कुदनुर गावातून ताम्रपर्णी नदीवरील धोंडगे बंधाऱ्यापासून हा रस्ता केवळ दोन किलोमीटर अंतराचा असून दुंडगे गावातून दुंडगे फाटा केवळ एक किलोमीटर अंतर आहे. तथापि दुंडगे गावापासून वीज कंपनी कार्यालय या एक किलोमीटर अंतराच्या टप्प्यात तीन चार ठिकाणी रस्त्यात आडव्या चरींची खुदाई करण्यात आली आहे. हे खड्डे गेली दहा वर्षे मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांसाठी जीव घेणे ठरत आहेत. रात्रीच्या अंधारात तर हे खड्डे दिसून येत नसल्याने अनेक वाहने येथे पडून अपघातग्रस्त होत आहेत. दुचाकी वर मागे बसलेल्या अनेक महिला या ठिकाणी पडून जखमी झाल्याची उदाहरणे घडली आहेत. दोन-चार दिवसांपूर्वी तेऊरवाडी येथील चार चाकी वाहन येथे अपघातग्रस्त झाल्याने गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. केवळ बलवत्तर म्हणून कोणी गंभीर जखमी किंवा जीवित हानी झाली नाही. वारंवार अशा घटना घडत असल्या तरीही इकडे कुणाचेच लक्ष नाही. हे संताप जनक आहे. तरी संबंधित ग्रामपंचायत व बांधकाम विभागाने इकडे लक्ष देऊन हा मार्ग वाहनधारकांसाठी निर्धोक करावा, अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment