चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
श्रावण महिना म्हणजे सुसंस्कार, भक्ती आणि आंतरिक शुद्धतेचा पर्वकाळ. याच पार्श्वभूमीवर दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथे “जागर श्यामच्या कथांचा” या नाविन्यपूर्ण वाचन उपक्रमास विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या उपक्रमाअंतर्गत साने गुरुजी लिखित ‘श्यामची आई’ या अजरामर साहित्यकृतीचे सामूहिक वाचन सुरू असून, शाळेमध्ये सुसंस्कारांचा सुगंध दरवळू लागला आहे. दररोज एक कथा विद्यार्थी प्रसारीत करतात.
प्राचार्य आर. पी. पाटील यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “समाजाला आज श्यामच्या आईच्या संस्कारांची गरज आहे. हे पुस्तक प्रत्येक घराघरात वाचले गेले पाहिजे.” ग्रंथपाल शरद हक्कल यांनी विद्यार्थ्यांना श्यामची आईच्या ५० प्रती उपलब्ध करून दिल्या आहेत. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी दररोज एक कथा निवडून वाचतात आणि त्यातील प्रेरणादायी घटना आपल्या वहीत लिहून ठेवतात.
या वेळी संजय साबळे म्हणाले, “वाचन संस्कृती जोपासण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. वाचनाने मन घडते आणि सुधारलेले मन कोणासमोरही झुकत नाही.” कार्यक्रमास उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे, व्ही. के. गावडे, जे. जी. पाटील, टी. व्ही. खंडाळे, वर्षा पाटील, विद्या डोंगरे, ओंकार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढत असून, श्रावणमास अधिक अर्थपूर्ण ठरतो आहे.
No comments:
Post a Comment