सण व उत्सव फटाके मुक्त करण्याचा निर्णय, चंदगड तालुक्यातील या ग्रामपंचायतीच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक - चंदगड लाईव्ह न्युज

01 August 2025

सण व उत्सव फटाके मुक्त करण्याचा निर्णय, चंदगड तालुक्यातील या ग्रामपंचायतीच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागातील जांबरे ग्रामपंचायतीने पर्यावरण रक्षणासाठी धाडसी निर्णय घेत फटाके मुक्त गावाचा आदर्श उभा केला आहे. येथील ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर करत सर्व सण, उत्सव फटाकेविना आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात साजरे करण्याचे ठरवले. ग्रामपंचायत अध्यक्ष विष्णू गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा ऐतिहासिक ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. ग्रामस्थ रामकृष्ण गावडे यांनी या उपक्रमाची सूचना मांडली, तर दीपा गावडे यांनी त्यास अनुमोदन दिले.

    हवेतील आणि ध्वनी प्रदूषणावर लगाम घालण्यासाठी ग्रामसभेचा पुढाकार घेतला आहे. पारंपरिक वाद्यांच्या सनई-चौघड्यात सण साजरे करण्याचा स्तुत्य उपक्रम आहे. फटाक्यांमुळे हवेचे आणि ध्वनी प्रदूषण वाढते. एका फटाक्याची ध्वनी पातळी जास्तीत जास्त १५ डेसीबल असावी अशी मर्यादा असताना ९० ते ११० डेसीबल पर्यंतच्या आवाजाची नोंद झाली आहे. परिणामी, निसर्ग आणि मानव आरोग्य यावर विपरीत परिणाम होतो आहे.

        या पार्श्वभूमीवर, जांबरे ग्रामपंचायतीने पुढाकार घेत पारंपरिक सणांमध्ये ढोल, ताशा, लेझीम, सनई-चौघडा यांचा वापर करून पर्यावरणपूरक साजरीकरणाचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायत अधिकारी अश्विनी कुंभार यांनी आभार मानून सांगितले की, “हा निर्णय केवळ पर्यावरण रक्षणासाठी नव्हे तर पुढच्या पिढ्यांना शुद्ध हवा आणि परंपरा टिकवण्यासाठीही महत्त्वपूर्ण आहे.”

No comments:

Post a Comment