![]() |
पकडलेला साप दाखवताना सर्पमित्र प्रा. सदाशिव पाटील |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
शेती मोटर पंप साठी शेतात उभारलेल्या विद्युत मोटर पंप मीटर पेटीत बसलेल्या नाग सापाने अचानक हल्ला केल्यामुळे शेतकऱ्याची भीतीने घाबरगुंडी उडाली. मजरे कार्वे, ता. चंदगड येथील शेतकरी दत्तात्रय रामू बोकडे यांच्या मोटर पंप मीटर पेटीत नागाने वास्तव्य केले होते. दि. ४/८/२०२५ रोजी सकाळी बोकडे विद्युत मोटर चालू करण्यासाठी गेल्या असता पेटीत आधीच आसरा घेतलेल्या नाग सापाने फुत्कार टाकत फणा उभारला. प्रसंगावधान राखून शेतकरी बोकडे यांनी मोटर सुरू करण्यासाठी पुढे केलेला हात झटक्यात मागे घेत धोका टाळला. अचानक घडलेल्या या प्रसंगाने त्यांच्या अंगाचा थरकाप उडाला. लागलीच त्यांनी ढोलगरवाडी येथील सर्पोद्यानचे सर्पमित्र प्रा. सदाशिव पाटील यांना फोन करून याबाबतची माहिती दिली. यावेळी सर्पमित्र पाटील यांनी साप लपलेल्या ठिकाणी दाखल होत मोटर पंप पेटीत आश्रय घेतलेल्या नाग सापाला शिताफिने पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू केले. याकामी त्यांना उत्तम पाटील यांचे सहकार्य लाभले.
पावसाळ्यात साप राहत असलेल्या बिळांत पाणी भरल्याने ते मोटर पंप पेटी किंवा डीपी पेटी सारख्या ठिकाणी आसरा घेऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी. असे आवाहन सर्पमित्र पाटील यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना केले.
No comments:
Post a Comment