चंदगड- पारगड रस्त्यावरील झाडाच्या फांदीत अडकून चंदगड आगाराच्या एसटीचे नुकसान, सार्व. बांधकाम विभाग कधी लक्ष देणार? नागरिकांचा सवाल - चंदगड लाईव्ह न्युज

22 August 2025

चंदगड- पारगड रस्त्यावरील झाडाच्या फांदीत अडकून चंदगड आगाराच्या एसटीचे नुकसान, सार्व. बांधकाम विभाग कधी लक्ष देणार? नागरिकांचा सवाल

चंदगड ते पारगड मुक्काम बस रात्रीच्या वेळी धुक्यातून मार्ग काढताना रस्त्यात वाढलेल्या झाडाच्या फांदीत अडकून अपघातग्रस्त झाली.

 चंदगड : सी एल वृत्तसेवा 

    मोटनवाडी फाटा ते इसापूर, पारगड मार्गा लगतची झाडेझुडपे बेसुमार वाढल्याने फांद्या रस्त्यावर आल्या आहेत. गेल्या आठ दिवसात दोन वेळा चंदगड आगाराची चंदगड, हेरे, वाघोत्रे, ईसापूर, पारगड रात्रीची मुक्कामी बस रस्त्यात वाढलेल्या फांदीत  अडकली. यात एसटी बसचे नुकसान झाले. वेळोवेळी मागणी करुनही सार्वजनिक बांधकाम विभागा कडून या फांद्या हटवण्याबाबत कोणतीच कार्यवाही न झाल्याने वाहनधारक व प्रवासी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

   सध्या पावसाळा सुरू असल्याने मार्गावरील कण्वेश्वर मंदिर परिसर ते पारगड हा २० किमी परिसर पावसाळी दाट धुक्यात हरवलेला असतो. वाहनांच्या हेडलाईट मधूनही पंधरा-वीस फुटाच्या पलीकडचे काही दिसत नाही. परिणामी रात्रीच्या वेळी या परिसरात वाहन चालवणे जिकिरीचे ठरते. पदोपदी अपघाताचे प्रसंग घडू शकतात. गेल्या चार-पाच दिवसात दोन वेळा रस्त्यावर वाकलेल्या झाडाझुडुपांच्या फांद्यांत चंदगड आगाराची एसटी बस अडकल्याने एसटीच्या समोरच्या भागाचे नुकसान झाले. ही बस रात्री पुढे न जाता पुन्हा चंदगड कडे वळवल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच मोठे संकट टळले. असे प्रसंग वर्षानुवर्षे या भागातील प्रवाशांना सहन करावे लागत आहेत.

   तालुक्यातील ऐतिहासिक स्थळ असलेल्या पारगड किल्ल्याकडे गेल्या काही वर्षांत पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. इतिहास प्रेमी पर्यटक बस व स्वतःच्या वाहनाने मोठ्या संख्येने ये-जा करत असतात. या वाहनांना वाढलेल्या फांद्यांचा धोका धुक्यामुळे कैक पटीने वाढला आहे. त्यामुळे मोठा अपघात होण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यात वाढलेल्या झाडाझुडुपांच्या फांद्या तोडून रस्ता निर्धोक करावा. अशी मागणी होत आहे. 

   दुसरीकडे रात्रीच्या वेळी धुक्यातून पुढील रस्ता चांगला दिसावा यासाठी एसटी बसला नियमित लाईट बरोबरच पिवळे हेडलाईट बसवावेत. अशा मागणीचे निवेदन चंदगड आगा प्रमुखांना सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार यानी दिले होते. तथापि वर्ष झाले तरी याची अंमलबजावणी झालेली नाही. किंबहुना या मागणीला कचऱ्याची टोपली दाखवली गेल्याचीच शक्यता आहे. ज्या गाड्या रात्रीच्या वेळी धुके असलेल्या तिलारी, दोडामार्ग, पारगड, इसापूर, आंबोली परिसरात धावतात किमान अशा गाड्यांना तरी पिवळे 'हेड लॅम्प' लावावेत. याची राज्य मार्ग परिवहन महामंडळाने  तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment