![]() |
कागणी येथील रुग्णाला आर्थिक मदत करताना कालकुंद्री सरस्वती विद्यालय २९८१ बॅचचे सदस्य श्रीकांत पाटील, शंकर कोले, गणेश पुजारी, यल्लाप्पा कांबळे व पी. के. गायकवाड |
कोवाड : सी एल वृत्तसेवा
कागणी (ता. चंदगड) येथील रहिवाशी कल्लाप्पा कांबळे यांना रोगाने ग्रासले आहे. या दलित कुटुंबाची हलाखीची आर्थिक परिस्थिती पाहून कालकुंद्री (ता. चंदगड) येथील श्री सरस्वती विद्यालय मधील सन १९८०-८१ दहावी बॅच कडून औषधोपचारासाठी आर्थिक मदत देण्यात आली.
वर्गमित्र ग्रुपचे सदस्य एम. के. गायकवाड यांना या रुग्णाबद्दल माहिती समजली. रोगाने पीडित कांबळे यांच्या उपचारासाठी होत असलेल्या बेसुमार खर्चामुळे कुटुंबाची ससेहोलपट सुरू आहे. त्यांच्या मुलीचे शिक्षण ही रखडले आहे. ही गोष्ट त्यांनी मंडळाचे अध्यक्ष, पत्रकार व चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांना सांगितली. वर्ग मित्रांच्या व्हाट्सअप ग्रुपवर ही माहिती पाठवल्यानंतर अनेक सदस्यांनी आर्थिक मदत जमा केली. जमा झालेली रक्कम या कुटुंबाच्या कागणी येथील घरी जाऊन कल्लाप्पा कांबळे व त्यांची मुलगी यांच्याकडे सुपूर्द केली.
यावेळी श्रीकांत पाटील यांच्यासह वर्गमित्र माजी सैनिक शंकर कोले, दक्ष कलेक्शन कोवाडचे मालक परशराम गायकवाड, एम. के. गायकवाड, तेऊरवाडी येथील निवृत्त प्राथमिक शिक्षक यल्लाप्पा कांबळे, कागणी येथील वर्गमित्र प्रा. बी. जी. खाडे, गणेश शंकर पुजारी आदी उपस्थित होते. या उपक्रमात कडलगे येथील वर्गमित्र मनोहर नारायण पाटील, बीएसएनएलचे निवृत्त कर्मचारी रामू कुंभार (किणी) यांनीही आपले आर्थिक योगदान दिले. या आर्थिक देणगी बद्दल कांबळे कुटुंबियांनी वर्ग मित्र मंडळाचे आभार व्यक्त केले.
रुग्ण कल्लाप्पा कांबळे हे या वर्गमित्र मंडळाचे सदस्य नाहीत. तरीही केवळ समजलेल्या माहितीनुसार संवेदनशीलतेतून ही मदत करण्यात आली. सामाजिक जाणिवेतून गरजूंना नेहमी सहकार्याची भावना जपणाऱ्या वर्ग मित्रांचे या उपक्रमाबद्दल कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment