![]() |
दाटे- हल्लारवाडी दरम्यान चा बंधारा ताम्रपर्णी नदीच्या महापुरात अक्षरशः दिसेनासा झाला आहे. |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
मान्सूनच्या पावसाने सध्या अंतिम टप्प्यात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. चंदगड तालुक्यात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे यंदाच्या पावसाळ्यात चौथी वेळ अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यात ताम्रपर्णी नदीवरील ५ तर घटप्रभा नदीवरील ७ अशा १२ बंधाऱ्यांचा समावेश आहे.
पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांमध्ये कोवाड, हल्लारवाडी- दाटे, करंजगाव- नांदवडे, पिळणी, भोगोली, कोणेवाडी आदी बंधाऱ्यांचा समावेश आहे. चंदगड जवळ ताम्रपर्णी नदीला पूर आल्याने चंदगड पासून तिलारी, दोडामार्ग पणजी कडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. ही वाहतूक सध्या पाटणे फाटा, मोटनवाडी मार्गे वळवण्यात आली आहे. दुसरीकडे गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव पुलावर पाणी आल्यामुळे चंदगड गडहिंग्लज वाहतूक बंद करण्यात आली आहे.
चंदगड तालुक्यातील झांबरे- उमगाव, फाटकवाडी व जंगहमट्टी हे तीन मध्यम प्रकल्प जुलै महिन्यातच ओव्हर फ्लो झाले असून अपवाद वगळता अन्य १८ लघुपाटबंधारे सुद्धा यापूर्वीच ओव्हर फ्लो झाले आहेत. परिणामी सध्याच्या पावसाचे सर्व पाणी दोन्ही नद्यातून पुढे कर्नाटकातील हिडकल धरणाकडे चालले आहे. चंदगड तालुक्यात गेल्या २४ तासात जंगमहट्टी प्रकल्प क्षेत्रात ७४ मिलिमीटर, घटप्रभा- फाटकवाडी प्रकल्प क्षेत्रात २०८ मिलिमीटर तर झांबरे मध्यम प्रकल्प क्षेत्रात १३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
आज दुपारपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाले असल्याने पातळी पाणी पातळीत स्थिर असली तरी महापुराचा धोका अद्याप टळलेला नाही.
कोवाड बाजारपेठ सतर्क
दरम्यान दोन दिवसातील धुंवाधार पावसाने ताम्रपर्णी नदीची पातळी वाढल्याने कोवाड बाजारपेठेत सखल भागातील घरे व दुकानांत पाणी शिरले आहे. पावसाचा जोर आणखी एक दिवस जरी असाच राहिल्यास बाजारपेठेवर महापूराची टांगती तलवार लटकलेली राहणार आहे. यामुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले असून पावसाची परिस्थिती बघून व्यापारी वर्ग दुकानातील साहित्य हलवण्याच्या तयारीला लागला आहे. नदीकाठच्या सर्व नागरिक व व्यापाऱ्यांना प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या सूचनेवरून मंडल अधिकारी व तलाठी यांनी कोवाड व किणी ग्रामपंचायतींच्या सहकार्याने सतर्क राहण्याच्या नोटीसा आधीच बजावल्या आहेत.
No comments:
Post a Comment