मराठा आरक्षण : मनोज जरांगे यांची भूमिका हीच चंदगड तालुक्यातील मराठी बांधवांची भूमिका...! कोवाड येथील मराठा बांधवांच्या बैठकीत काय झाला निर्णय... - चंदगड लाईव्ह न्युज

25 August 2025

मराठा आरक्षण : मनोज जरांगे यांची भूमिका हीच चंदगड तालुक्यातील मराठी बांधवांची भूमिका...! कोवाड येथील मराठा बांधवांच्या बैठकीत काय झाला निर्णय...

  

संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या भूमिकेला सक्रिय पाठिंबा व्यक्त करताना मराठा कोवाड परिसरातील मराठा कार्यकर्ते.

कोवाड : सी एल वृत्तसेवा

    गोरगरीब गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष योद्धा, मराठा हृदय सम्राट मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाबाबत जी भूमिका घेतली आहे तीच भूमिका चंदगड तालुक्यातील तमाम मराठा बांधवांची आहे. असे निःसंदिग्ध प्रतिपादन प्रा. दीपक पाटील यांनी केले. ते कोवाड येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील मुंबई येथील आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी बोलावलेल्या मराठा समाजाच्या बैठकीत बोलत होते.

       मराठा आरक्षणाच्या प्रश्नाची पुन्हा एकदा ठिणगी उडाली आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील मुंबईत होत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चंदगड तालुक्यातील सकल मराठा बांधवांच्या वतीने २९ ऑगस्ट रोजी अकरा वाजता पाटणे फाटा येथे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी चंदगड तालुक्यातील मराठा बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मुंबईत होणाऱ्या आंदोलनाला जाण्यासाठीचे नियोजन ही ठरवण्यात आले.          हजारो वर्षे मराठा समाजाने सर्व जातींना स्वतः काबाडकष्ट करून जगवले आहे. बदलत्या काळात जमिनीच्या वाटण्या व अन्य अनेक कारणास्तव मराठा समाजाची आर्थिक घडी बिघडली आहे. या समाजाला राजकारणाच्या किडीने पोखरले असून मराठी मुले राजकारणी लोकांच्या चिथावणीला बळी पडून बरबाद होत आहेत. यातून सावरण्यासाठी समाजाला नोकरी व शिक्षणात आरक्षण अत्यावश्यक बनले आहे. आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी एक होऊन मनोज जरांगे यांच्या भूमिकेला पाठिंबा देऊया असे आवाहन शंकर मनमाडकर यांनी केले. यावेळी प्रभाकर खांडेकर यांनी बोलताना मराठा समाज बांधवांनी पक्षीय झेंडे बाजूला ठेवून आरक्षण मिळेपर्यंत एकजूट टिकवल्याशिवाय तरणोपाय नाही असे सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते एम. जे. पाटील आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. 

      यावेळी मनोज जरांगेंच्या भूमिकेला पाठिंबा देणारा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी प्रा एस. एन, राजगोळकर,  विलास भावकु पाटील, पांडुरंग जाधव, रामचंद्र व्हन्याळकर, गोविंद पाटील, पिणू पाटील, नारायण कनुकले, ल. पु. बामणे, दयानंद लांडे,  गुंडोपंत देसाई. पुंडलिक नौकुडकर, बी. एम. पाटील आदी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment