डिझेल टँकरशी झालेल्या धडकेत चिंचणे येथील एक ठार, दोघे गंभीर, राजगोळी खुर्द जवळ घडली घटना - चंदगड लाईव्ह न्युज

23 August 2025

डिझेल टँकरशी झालेल्या धडकेत चिंचणे येथील एक ठार, दोघे गंभीर, राजगोळी खुर्द जवळ घडली घटना

 

मारुती बाबू पाटील

चंदगड : सी एल वृत्तसेवा

        राजगोळी खुर्द (ता चंदगड) गावानजीक राजगोळी खुर्द - दड्डी मार्गावर पेट्रोल-डिझेल वाहतूक करणारा टॅंकर व दुचाकीच्या झालेल्या धडकेत चिंचणे (ता. चंदगड) गावचा एक जण जागीच ठार, एक जण गंभीर जखमी तर तिसरा किरकोळ झाल्याची घटना काल शुक्रवारी दुपारी साडेचार च्या सुमारास घडली. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव मारुती बाबू पाटील (वय ६७) गंभीर जखमी झालेला विष्णू दुंडाप्पा तरवाळ (वय ५५), तर किरकोळ जखमी असलेल्या व्यक्तीचे नाव सागर मसाप्पा सुतार (वय ३४) सर्व राहणार  चिंचणे अशी त्यांची नावे आहेत.

         हे सर्वजण एकाच दुचाकीवरून कामानिमित्त राजगोळी खुर्द येथे आले होते. काम उरकून  दड्डी रोड वरून कामेवाडी मार्गे चिंचणे कडे जात असताना राजगोळी खुर्द गावातील शेवटच्या घराजवळ दड्डी कडून येणाऱ्या डिझेल टँकरशी त्यांच्या दुचाकीची धडक झाली. दुचाकीवरून खाली पडल्यानंतर टँकरचे चाक अंगावरून गेल्याने महादेव कोळी आदिवासी समाजातील मारुतीचा जागीच मृत्यू झाला. तरवाळ गंभीर जखमी झाल्याने तो कोमात गेला असून त्याला बेळगाव येथील रुग्णालयात अति दक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर आज दुपारी शस्त्रक्रिया केल्याचे समजते. यातील दुचाकी चालक सागर सुतार हा किरकोळ जखमी झाला. दरम्यान टँकर चालक पळून गेल्याचे समजते. मृत मारुती यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना व‌ नातवंडे असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment