महायुतीने केवळ उद्योगपतींचेच कर्ज माफ केले, राज्यातील शेतकरी नावापुरताच राजा...! शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांची सरकारवर तोफ चंदगड येथून प्रारंभ झालेल्या शेतकरी कर्जमुक्ती दिंडीला अभूतपूर्व प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

10 August 2025

महायुतीने केवळ उद्योगपतींचेच कर्ज माफ केले, राज्यातील शेतकरी नावापुरताच राजा...! शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांची सरकारवर तोफ चंदगड येथून प्रारंभ झालेल्या शेतकरी कर्जमुक्ती दिंडीला अभूतपूर्व प्रतिसाद

चंदगड : सी एल वृत्तसेवा 
    शेतकरी आता नावापुरताच राजा राहिला आहे. सत्तेच्या सारीपाटात फक्त निवडणुका आल्या की शेतकरी राजा होतो. महायुती सरकारने बड्या उद्योगपतींची कर्ज माफ केली मात्र जगाच्या पोशिंद्याला मात्र दुर्लक्षितच ठेवले. राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था आज बिकट आहे. त्यामुळे या विरोधात शेतकरी कर्जमुक्ती दिंडीच्या माध्यमातून रान उठवल्याशिवाय या सरकारला पाझर फुटणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही तोपर्यंत शिवसेना मागे हटणार नाही असे प्रतिपादन शिवसेनेचे  ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी केले. 
 शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करा प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने चंदगड येथील रवळनाथ मंदिरातून शेतकरी कर्जमुक्ती दिंडीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी संबोधित करताना नितीन बानगुडे पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते संजय पवार, जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, रविकिरण इंगवले, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, संजय चौगुले, वैभव उगळे, सह संपर्कप्रमुख विजय देवणे,  रियाज शमनजी, चंगेज खान, तालुकाप्रमुख दिलीप माने, अजित खोत, युवराज पोवार आदी मान्यवर उपस्थित होते.
    यावेळी बोलताना नितीन बानगुडे पाटील पुढे म्हणाले, कृषी क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर आहे. येथील शेतकरी प्रयोगशील व कष्टाळू आहे. मात्र दुर्दैवाने अलीकडच्या काळात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. खते, बियाणे, इंधन व कृषी यंत्रांचे दर गेल्या दहा वर्षात कैक पटीने वाढले. मात्र शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव मात्र कवडीमोलच आहेत. शेतकऱ्याने विविध नैसर्गिक संकटे झेलत उत्पादन घ्यायचे व सरकारने मात्र त्यांच्या शेतीमालाचे दर पाडायचे अशा दुहेरी चक्रात शेतकरी अडकला आहे. नावापुरताच शेतकरी राजा राहिला असून सत्तेच्या सारीपाटात निवडणुका आल्या की शेतकरी राजा होतो ही वस्तुस्थिती आहे. आज राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या डोक्यावर १ लाख ५८ हजारांचे कर्ज आहे. २०२४ साली २७०६ शेतकऱ्यांनी तर गेल्या सहा महिन्यात ७६३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करतात. त्यामुळे अच्छे दिनाच्या केवळ वल्गनाच ठरल्या असून येथील शेतकरी वर्ग बुरे दिनातून मार्गक्रमण करत आहे याच्याइतके दुर्दैव नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २०१९ ला मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेताच पहिल्याच बैठकीत पहिल्यांदा केवळ आधार कार्डावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करत शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला होता. त्यामुळे शिवसेना त्यावेळीही शेतकऱ्यांच्या बाजूने होती व आज देखील आहे. त्यामुळे या शेतकरी कर्जमुक्ती दिंडीच्या माध्यमातून रान उठवल्याशिवाय या महायुती सरकारला पाझर फुटणार नाही.  जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्त बसणार नाही असा दिलासा त्यांनी शेतकऱ्यांना दिला. 
संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले, कृषीप्रधान या देशात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृहात चर्चा सुरू असताना राज्याचे कृषिमंत्री मोबाईल वरून रमी खेळतात हे या राज्याचे दुर्भाग्य आहे.  शेतकऱ्यांची जाण नसणाऱ्या अशा या सरकारला या दिंडीच्या माध्यमातून जाग आणण्याची गरज आहे. 
सह संपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले, राज्यातील सरकार हे महायुतीचे नसून अदानी, अंबानीचे, कोल्हापुरातील माधुरी हत्ती घेऊन जाणारे, धारावीतील झोपडपट्टी पडणारे, गोरगरिबांच्या घरावर बुलडोजर फिरवणारे सरकार आहे. त्यामुळे या सरकारला जाग आणण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून शेतकरी कर्जमुक्ती दिंडीची मशाल पेटवली आहे. 
 जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे शिकवले. राज्यातील शेतकरी भरडला जात असताना कृषिमंत्री मात्र रमी खेळण्यात गुंततात ही बाब दुर्दैवी आहे. शेतकरी कर्जमाफी ऐवजी हे सरकार शक्तीपीठ महामार्ग करण्यात धन्यता मानत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नरडीवर पाय ठेवून हा उद्योग हे सरकार करत असेल तर आम्ही कदापी शांत बसणार नाही. या शेतकरी कर्जमुक्ती दिंडीच्या माध्यमातून झोपलेल्या या सरकारला जाग आणू असा इशारा त्यांनी दिला. 
    दरम्यान, प्रारंभी रवळनाथ मंदिराच्या आवारातील शेतकरी कर्जमुक्ती दिंडी रथाचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर देव श्री रवळनाथला साकडे घालून या सरकारला कर्जमुक्ती करण्याची सदबुद्धी येवो असे मागणे घालण्यात आले. त्यानंतर दिंडी शहरातील प्रमुख मार्गावरून आणण्यात आली. यावेळी या दिंडीत शिवसेनेचे विविध पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सेना, महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन तालुकाप्रमुख दिलीप माने यांनी केले.

No comments:

Post a Comment