चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
“खेळ म्हणजे स्वतःला ओळखण्याची आणि घडवण्याची संधी आहे. शाळा ही केवळ पुस्तकांचे शिक्षण देणारी संस्था नसून, जीवनाचे प्रशिक्षण देणारे केंद्र आहे. आणि खेळ म्हणजे जीवन जगण्याची कला शिकवणारी शाळा आहे,” असे प्रतिपादन प्रा. अॅड. एन. एस. पाटील यांनी दि न्यू इंग्लिश स्कूल व न.भु. पाटील ज्युनिअर कॉलेज, चंदगड येथे आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
ते पुढे म्हणाले, “खेळातून शिस्त, निष्ठा, संयम, नेतृत्व आणि संघभावना या जीवनमूल्यांची रुजवात होते.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य आर. पी. पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानी एल. डी. कांबळे होते. क्रीडा स्पर्धेचे ध्वजारोहण संस्थेचे सचिव एम. एम. तुपारे यांच्या हस्ते झाले, तर एल. डी. कांबळे यांच्या हस्ते क्रीडा ज्योती प्रज्वलित करण्यात आली.
या प्रसंगी माजी सचिव प्रा. आर. पी. पाटील म्हणाले, “खेळाडू वृत्ती जपा आरोग्य, आनंद आणि यश या तिन्हीचा तोच मार्ग आहे.” क्रीडा शिक्षक टी. व्ही. खंदाळे यांनी सर्व खेळाडूंना क्रीडाशपथ दिली. भालाफेक स्पर्धेत विभागीय स्तरावर यश संपादन करणाऱ्या रिया सांबरेकर व जैनब मुल्ला या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला संस्थेचे खजिनदार अनंत सुतार, ज्येष्ठ संचालक शामराव मुरकुटे, विद्या संकुलातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साबळे यांनी केले, तर आभार उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे यांनी मानले.


No comments:
Post a Comment