चंदगड शहराचा चेहरामोहरा बदलणार, शाश्वत विकासासाठी राजर्षी शाहू आघाडीला बळ द्या, सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा : मंत्री हसन मुश्रीफ, चंदगडला प्रचार सभा - चंदगड लाईव्ह न्युज

01 December 2025

चंदगड शहराचा चेहरामोहरा बदलणार, शाश्वत विकासासाठी राजर्षी शाहू आघाडीला बळ द्या, सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा : मंत्री हसन मुश्रीफ, चंदगडला प्रचार सभा

चंदगडची जनता भोळी पण अन्यायाविरुद्ध पेटून उठली तर काय तरी सांगता येत नाही : डॉ. बाभुळकर 

मी केलेल्या कामांचे श्रेय लाटणे हा विरोधकांचा एक कलमी कार्यक्रम : माजी आम. राजेश पाटील

सभेत बोलताना महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

चंदगड : सी एल वृत्तसेवा

      चंदगडचा चेहरामोहरा बदलण्यासाठी राजश्री शाहू आघाडीच्या उमेदवार सक्षम पर्याय आहेत. चंदगडचा विकास केवळ आम्हीच करू शकतो. दयानंद काणेकर यांच्या उमेदवारीवर त्यांनी ठाम विश्वास व्यक्त करत त्यांना तत्परता, दानत आणि गोरगरिबांसाठी तत्काळ धावून जाण्याची वृत्ती असलेली व्यक्ती म्हणून गौरवले, चंदगडचे स्वप्न बघून काम करणारा उमेदवार समोर आहे. एक संधी दिल्यास शहराचा कायापालट शक्य असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंदगड येथे झालेल्या नगरपंचायत निवडणूक प्रचार सभेत व्यक्त केले.

सभेत बोलताना माजी आमदार राजेश पाटील

    शाहू आघाडीच्या सभेत मंत्री मुश्रीफ यांनी ``महायुती सरकारची दमदार कामगिरी सुरु आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. सरकारच्या विविध योजना लोकांच्यापर्यंत पोहचवून त्यांना त्याचा लाभ मिळवून द्या. लोक आपोआप तुमच्या पाठीशी येतील. यावेळी त्यांनी  शहराच्या विकासाशी संबंधित अनेक मुद्यांवर सविस्तर भाष्य केले.`` 

        अमृत जल जीवन प्रकल्पाबाबत त्यांनी महत्त्वाची माहिती देत त्यांनी सांगितले की, २४ कोटी रुपयांची योजना अंतिम मंजुरीच्या टप्प्यात आहे. अर्थ खात्याशी बैठक घेऊन ही योजना तातडीने मार्गी लावली जाईल, असे त्यांनी सांगितले. शहरातील दूषित पाणी सरळ नदीत मिसळत असल्याने निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्यांवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. शुद्धीकरण प्रकल्प उभारून शुद्ध पाणीच नदीत सोडण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, ज्यामुळे परिसरातील गावांचे आरोग्य सुरक्षित राहील, असेही त्यांनी नमूद केले.

सभेला उपस्थित जनसमुदाय.

     शाहू आघाडी पॅनलच्या वचननाम्यातील  प्रमुख मुद्यांमध्ये अमृत योजना, शहरातील क्रीडांगणाचा विस्तार, वाहतूक व्यवस्थेची सुधारणा, रवळनाथ मंदिराचे सुशोभीकरण, सोलार लाईटचे जाळे, महिला सक्षमीकरण उपक्रम, तसेच गरीब वस्त्यांचा विकास यांचा समावेश असेल, अशी माहिती त्यांनी दिली. या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी दयानंद काणेकर यांची निवड महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

        १०० गृहनिर्माणासाठी कोटीच्या पुढील निधीची तरतूद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत त्यांनी पुढील पाच वर्षांत चंदगड शहराचे सर्वांगीण आधुनिकीकरण करण्याचा विश्वास व्यक्त केला. कागल आणि गडहिंग्लज येथे झालेल्या विकासाचे उदाहरण देत, त्या अनुभवानुसार चंदगडमधील मूलभूत प्रश्न सोडवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

     चंदगडची जनता भोळी मात्र अन्यायाविरुद्ध एकदा पेटून उठली तर काय होते! ते एव्हीएच प्रकल्प इतर घटनावरून यापूर्वीही लक्षात आले आहे. दोन डिसेंबरला ही त्याची प्रचिती परत मिळेल. असा विश्वास नंदाताई बाभूळकर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.

     यावेळी बोलताना माजी आमदार राजेश पाटील म्हणाले विरोधकांनी गेल्या वर्षभरात कोट्यावधींची आश्वासने दिली असली तरी रुपयाचे काम झाले नाही मात्र आम्ही केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा खटाटो प सुरू असून खोटे जाहीरनामे प्रसिद्ध करून लोकांना फसवता येत नाही असा घनाघाती हल्ला केला. 

    माजी आमदार राजेश पाटील, गोपाळराव पाटील, नंदिनी बाभुळकर आणि रामराजे कुपेकर यांनी शहरातील पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची दुरवस्था आणि सार्वजनिक सोयीसुविधांची कमतरता यां सारख्या समस्या अधोरेखित केल्या. या सर्व समस्यांची नोंद घेतल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आणि त्यावर टप्प्याटप्प्याने उपाययोजना राबविण्याचे संकेत दिले.

    यावेळी राजर्षी शाहू पॅनलचे महा विकास आघाडीतील शरद पवार राष्ट्रवादी, अजित पवार राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस आदी पक्षांचे नेते, चंदगड नगरपंचायत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दयानंद काणेकर सर्व १७ प्रभागातील उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment