शिनोळी / सी. एल. वृत्तसेवा
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, कोल्हापूर यांच्या वतीने आणि सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेकोटी काव्य संमेलनाचा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
काव्य संमेलनाध्यक्ष बाबू पाटील म्हणाले “शब्द म्हणजे ज्वालाग्रही ठिणगी…मनात पडली की कविता निर्मिती होते.ही शेकोटी जिवंत ठेवण्यासाठी आपण सारेच ज्योतवाहक साहित्य हा समाजाचा आत्मा, आणि कवी हा त्याचा स्वच्छ दर्पण. कवितेने माणसं जोडली पाहिजेत, जगाला नवा प्रकाश दिला पाहिजे.” यावेळी सुप्रसिद्ध लोखंड व्यापारी ओमकार ट्रेडर्सचे संचालक दत्तात्रय पाटील साहेब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
संजय साबळे यांनी आपल्या प्रभावी प्रास्ताविकातून “सीमाभूमीत साहित्याची शेकोटी अखंड पेटती ठेवणे, नवोदितांना व्यासपीठ देणे आणि शब्दांना दिशा देणे हीच परंपरा जिवंत ठेवण्याची गरज आहे,” काव्य संमेलनाचा हेतू उलगडला. सीमाभूमीत साहित्याची आणि शेकोटीच्या प्रकाशात शब्दांना संवाद देणे असा मंगल भाव व्यक्त करत त्यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट प्रेरणादायी शब्दांत मांडले.
कवी बाबूराव पाटील यांनी शब्द, भावना आणि ग्रामीण मातीचा सुगंध यांना कवितेत कसे स्थान द्यावे याबद्दल अतिशय काव्यात्मक, संवेदनशील मार्गदर्शन केले. “कविता म्हणजे मनातली शेकोटी…ज्योत मनात पेटली की, शब्द स्वतःच चांदण्याच्या वाटेवर चालायला लागतात.” असे त्यांनी सांगत कवितेचे सार, कवीचे कर्तव्य आणि समाजातील साहित्याची भूमिका यावर अत्यंत प्रभावी भाष्य केले. रवींद्र पाटील म्हणाले “माझा वाढदिवस शब्दांच्या उबेत, कवीबंधूंच्या साथीत आणि साहित्याच्या सुगंधात साजरा झाला. हाच माझ्यासाठी खरा गौरव. सीमेचा प्रश्न हा केवळ राजकारणाचा नाही, तर आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. कवितेनं आवाज दिला, आणि आपण सर्वांनी त्या आवाजाला प्रतिध्वनी दिला. याबद्दल मी सदैव ऋणी आहे.”
बेळगाव, चंदगड, गडहिंग्लज, कणकवली आदी भागातून आलेल्या २६ कवींनी उत्स्फूर्तपणे आपली कविता सादर केली.कवी दिपक तळवडेकर सिंधूदूर्ग, दिनकर सदाशिव गुरव (महागांव) कांचन दत्त (कोल्हापूर) बेळगावहून संजय साबळे, प्रा. डॉ. मनिषा नाडगौडा, डॉ. मयुरी जाधव, रोशनी हुंदरे, पूजा सूतार, अस्मिता अळतेकर, अक्षता येळळूरकर, शुभदा खानोलकर, स्नेहल बर्डे, किरण पाटील, अशोक सुतार, विनायक पाटील, शांताराम गुरव तसेच चंदगड मधील शर्वरी संदिप चिंचनगी, भाऊ बोकमूरकर (शिनोळी), दशरथ पाटील (जेलुगडे), युवराज पाटील (धुमडेवाडी), देवयानी तानाजी पाटील, श्रावणी परशराम कांबळे, तानाजी पाटील आदिकवींनीआपले काव्य सादर केले.
सामाजिक, प्रेरणादायी, ग्रामीण, देशभक्तीपूर्ण आणि जीवनरंगांनी नटलेल्या कविता प्रेक्षकांना खिळवून ठेवत गेल्या. सीमाकवी रवींद्र पाटील यांनी आपल्या मनोगतात कार्यक्रमातील प्रेमळ उपस्थिती, कवीबंधूंचा सहभाग आणि साहित्यिक प्रेरणा याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी एन. टी. पाटील' केंद्रप्रमुख आप्पाराव पाटील, केतन खांडेकर, सचिन मारती पाटील तानाजी पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाऊ बोकमूरकर यांनी केले. रवींद्र पाटील यांनी आभार मानले.

No comments:
Post a Comment