असंघटीत क्षेत्रातील कामगारांना आर्थिक व कायदेशीर संरक्षण द्या – प्रा. डॉ. उदय नारकर, चंदगड महाविद्यालयात व्याख्यान - चंदगड लाईव्ह न्युज

19 December 2025

असंघटीत क्षेत्रातील कामगारांना आर्थिक व कायदेशीर संरक्षण द्या – प्रा. डॉ. उदय नारकर, चंदगड महाविद्यालयात व्याख्यान

 

चंदगड महाविद्यालयातील कार्यक्रमात बोलताना प्रा. डॉ. उदय नारकर,

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        स्वातंत्र्यपूर्व काळात तयार झालेले अनेक कामगार कायदे रद्द करून केंद्र सरकारने चार नवीन सर्वसमावेशक कामगार कायदे अस्तित्वात आणले असले, तरी कोणत्याही कायद्यातील मानवतावाद आणि मानवी चेहरा हरवून चालणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन कामगार चळवळीचे आघाडीचे नेते व मार्गदर्शक प्रा. डॉ. उदय नारकर यांनी केले. संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांचे मूलभूत प्रश्न सोडवून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणे हाच नवीन कामगार कायद्यांचा खरा उद्देश असला पाहिजे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

        ते येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “कामगार विषयक कायद्यातील बदल” या विषयावरील मार्गदर्शनपर व्याख्यानात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते.

        पुढे बोलताना प्रा. डॉ. नारकर म्हणाले की, भारतात असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची संख्या प्रचंड असूनही आजही त्यांना पुरेसे आर्थिक व कायदेशीर संरक्षण मिळत नाही. कामगारांचे शोषण केवळ कारखान्यांमध्येच नव्हे, तर अनेकदा शासकीय यंत्रणांच्या पातळीवरही होत असल्याची वस्तुस्थिती आहे. कामगारांचे वेतन, सुरक्षितता, सामाजिक संरक्षण, आरोग्य व सन्मानजनक जगणे यासारख्या मूलभूत समस्या आजही प्रलंबित आहेत. त्यामुळे नवीन कामगार कायद्यांचा सखोल, चिकित्सक आणि जबाबदारीने अभ्यास करून त्यातील उणिवा सरकारच्या निदर्शनास आणणे ही समाजातील जाणकार घटकांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

            अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी सांगितले की, देशात अस्तित्वात असलेल्या प्रत्येक कायद्याची माहिती असणे नागरिक म्हणून आवश्यक आहे. जुन्या कायद्यांमध्ये दुरुस्ती होऊन किंवा बदलत्या परिस्थितीनुसार नवीन कायदे अस्तित्वात येत असतात. विशेषतः विद्यार्थ्यांनी कामगार कायदे, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये याबाबत सजग राहून माहिती घेणे अत्यंत गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कामगार नेते प्रा. आबासाहेब चौगुले यांनीही विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन केले 

        कार्यक्रमाचे आयोजन व  सूत्रसंचालन प्रा. डॉ. टी. ए. कांबळे यांनी केले. यावेळी त्यांनी वाणिज्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक व उपक्रमांचा आढावाही सादर केला. पाहुण्यांचा परिचय डॉ. ए. वाय. जाधव यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन प्रा. व्ही. के. गावडे यांनी केले.

        या कार्यक्रमास डॉ. पी. एल. भादवणकर, प्रा. ए. डी. कांबळे, प्रा. सुहास कुलकर्णी, डॉ. जी. वाय. कांबळे, डॉ. एस. एस. सावंत, डॉ. एस. डी. गावडे, डॉ. एन. के. पाटील, डॉ. एस. एन. पाटील, प्रा. पूजा देशपांडे यांच्यासह वाणिज्य विभागातील बहुसंख्य प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment