डहाणू-बोर्डी समुद्रकिनाऱ्यावर ७ डिसेंबर रोजी भव्य मॅरेथॉन व महास्वच्छता अभियान, चंदगड तालुका पत्रकार संघाचा सहभाग - चंदगड लाईव्ह न्युज

05 December 2025

डहाणू-बोर्डी समुद्रकिनाऱ्यावर ७ डिसेंबर रोजी भव्य मॅरेथॉन व महास्वच्छता अभियान, चंदगड तालुका पत्रकार संघाचा सहभाग

 

चंदगड : सी एल वृत्तसेवा

        पालघर जिल्ह्यातील डहाणू ते बोर्डी समुद्र किनाऱ्यावर येत्या ७ डिसेंबर रोजी एक अद्वितीय आणि ऐतिहासिक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. आउट प्ले स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने डहाणू - बोर्डी बीच मॅरेथॉन तसेच डहाणू बोर्डी बीच क्लीन अप ड्राइव्ह २०२५ हा भव्य उपक्रम पार पडणार असून, यावेळी १८ किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्यावर एकाच ठिकाणी सर्वाधिक प्लास्टिक कचरा गोळा करण्याचा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

      या उपक्रमात सुमारे ३ हजार धावपटू आणि ७ ते ८ हजार स्वयंसेवक सहभागी होणार असून एनसीसी, एनएसएस, विद्यार्थी, स्थानिक ग्रामस्थ, मत्स्य व्यवसायिक, स्वयंसेवी संस्था तसेच पर्यावरण कार्यकर्ते मोठ्या संख्येने यात योगदान देणार आहेत. या अभूतपूर्व उपक्रमात सहभागी होण्यासाठी चंदगड तालुक्यातील धावपटूंसह मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघ, डिजिटल मीडिया परिषद तालुका व जिल्हा कार्यकारणीचे सदस्य, अध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहभागी होणार आहेत. 

       धावपटूंसाठी ५ किलोमीटर वेव्ह रन, १० किलोमीटर मॅन्ग्रोव्ह रन आणि २१ किलोमीटर ब्ल्यू प्लॅनेट हाफ मॅरेथॉन अशा तीन श्रेणीत स्पर्धा होणार आहे. तर किनारपट्टीवरील संपूर्ण १८ किलोमीटर परिसर नऊ ते दहा झोनमध्ये विभागण्यात येणार असून, प्रत्येक झोनमध्ये स्वयंसेवकांच्या पथकांची विशेष नेमणूक केली जाईल. प्लास्टिक व इतर समुद्री कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण आणि वजन या सर्व प्रक्रियांचे डॉक्युमेंटेशन गिनिजच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काटेकोरपणे केले जाणार आहे. एका दिवसात अंदाजे २.५ ते ३ टन प्लास्टिक कचरा संकलित करण्याचे लक्ष्य आयोजकांनी ठेवले आहे. आउट प्ले स्पोर्ट्स फाउंडेशनने गेल्या काही वर्षांत पर्यावरण संवर्धन, क्रीडा आणि युवक सहभागावर आधारित अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. बी अ गार्डियन ऑफ नेचर या संकल्पनेतून डहाणू - बोर्डी किनाऱ्याच्या संवर्धनासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. या उपक्रमासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, स्थानिक संस्था, शाळा महाविद्यालये आणि विविध संघटनांचे सहकार्य लाभत आहे.

   समुद्री कासवे, खेकडे, सागरी पक्षी यांच्यासह किनारपट्टीवरील जैवविविधतेला प्लास्टिक कचऱ्यामुळे निर्माण होणारा धोका नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमाच्या शेवटी गोळा करण्यात आलेला कचरा प्रक्रिया करण्यासाठी अधिकृत संस्थांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment