चंदगड (प्रतिनिधी): 19-12-2025
कोरज (ता. चंदगड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कु. सुकन्या परशराम कांबळे हिने क्रीडा क्षेत्रात घवघवीत यश संपादन केले आहे. उंच उडी – मोठा गट (मुली) या वैयक्तिक क्रीडा प्रकारात तिने जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून कोरज शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
केंद्रस्तर व तालुकास्तरावरील स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी करत सुकन्याने थेट जिल्हास्तरावर विजेतेपद मिळवले. तिच्या या यशामुळे केवळ शाळेचेच नव्हे, तर चंदगड तालुक्याचेही नाव जिल्हा पातळीवर उज्ज्वल झाले आहे.
या यशामागे मार्गदर्शक शिक्षक श्री. सचिन शिरगांवकर सर व श्री. अशोक चिंचणगी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली भोईटे मॅडम यांनी दिलेले सातत्यपूर्ण प्रोत्साहन विद्यार्थिनीच्या यशात महत्त्वाचे ठरले.
तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील साहेब, तालुका क्रीडा विभाग प्रमुख तथा विस्तार अधिकारी सुमित चंद्रमणी साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. नामदेव माईनकर साहेब तसेच नागणवाडी केंद्रातील केंद्रप्रमुख श्री. विनायक पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्य यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
कु. सुकन्या कांबळे हिच्या या दैदीप्यमान यशामुळे कोरज शाळेचा नावलौकिक जिल्हा पातळीवर वाढला असून परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यशस्वी विद्यार्थिनी, मार्गदर्शक शिक्षक व शाळेच्या संपूर्ण टीमचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.


No comments:
Post a Comment